Mahavikas Aghadi Protest In Pune | वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधण्यासाठी ‘मविआ’चे कार्यकर्ते घोड्यावर; अनोख्या आंदोलनांची शहरात चर्चा

पुणे: शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. दरम्यान याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनाची आता शहरात चर्चा होत आहे. (Traffic Jam In Pune)
पुणे शहरातील वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधण्यासाठी अभिनव आंदोलन करत प्रतिष्ठित नागरिकांनी राष्ट्रभुषण चौक ते एस पी कॉलेजच्या दरम्यान घोड्यावरून प्रवास केला. शहरात प्रवास करणे सामान्य पुणेकरांना जिकरीचे झाले आहे. पुण्यातील महत्त्वाचे रस्ते, गल्लीबोळ, बाजारपेठांमध्ये रोज वाहतूक कोंडी अनुभवायला मिळत आहे.
विद्यार्थी, कामगार वर्ग, व्यापारी, रुग्ण यांना शाळा, कॉलेज, ऑफिस, दुकान, हॉस्पिटलमध्ये जाताना अक्षरशः तास तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. शिवाय या कोंडीमुळे अपघात होत आहेत. प्रशासन या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करीत आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडी आणि खड्डे चूकवून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
आरटीओ, महापालिका वाहतूक आणि पोलीस शाखा यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने अभिनव आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला . यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर, माजी महापौर अंकुश काकडे, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, अजित अभ्यंकर , शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगिता तिवारी, माजी उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, माजी नगरसेवक विशाल धनवडे सहभागी झाले होते.