Pune RTO | नोंदणी न करताच वाहनविक्री केल्याने वाहनविक्री परवाना रद्द; आरटीओ कडून विक्रेत्यांवर होणार कारवाई

पुणे : Pune RTO | नोंदणी न करताच ग्राहकांना वाहनांची विक्री केल्याप्रकरणी पुणे ‘आरटीओ’ अकरा वाहन विक्रेत्यांचे ट्रेड सर्टिफिकेट (वाहन विक्री परवाना) रद्द करणार आहे. अकरा वाहन विक्रेत्यांना ट्रेड सर्टिफिकेट रद्द का करू नये? अशी कारणे दाखवा नोटीस पुणे आरटीओने दिली होती. त्यावर काही विक्रेत्यांनी उत्तर दिले, तर काहींनी दिले नाही.
अकरापैकी पाच विक्रेते पुण्यातील असून उर्वरित अन्य शहरातील आहे. अन्य शहरातील आरटीओ कार्यालयांना पुणे आरटीओने संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. पुण्यातील विक्रेत्यांवर पुणे आरटीओ कारवाई करणार आहे.
कल्याणीनगर रस्ते अपघात प्रकरणानंतर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने वाहन तपासणी मोहीम सुरू केली होती. त्यात पुण्याच्या वायुवेग पथकाला विनानोंदणीच्या अकरा दुचाकी रस्त्यावर फिरताना आढळून आल्या होत्या.
तेव्हा संबंधित विक्रेत्यांना नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत खुलासा करण्याची मुदत दिली होती. मोटार वाहन कायद्यानुसार पुणे आरटीओ त्या पाच विक्रेत्यांवर कारवाई करणार आहे. ही कारवाई किती दिवसांसाठी केली जाईल, हे अद्याप ठरलेले नाही.
मोटार वाहन कायद्यानुसार आरटीओ प्रशासन ७, १५ किंवा २१ दिवसांसाठी ट्रेड सर्टिफिकेट रद्द करू शकते. रद्द केलेल्या कालावधीत वाहन विक्रेत्याला एकाही वाहनांची विक्री करता येत नाही.
आरटीओ कार्यालयात वाहनविक्रेत्याला दिलेला ‘लॉगइन आयडी’ ब्लॉक केला जाईल. त्यामुळे विक्रेत्यांना वाहनांची विक्री करता येणार नाही. पुण्यात ‘आरटीओ’कडून पहिल्यादांच अशी कारवाई होत असल्याने चर्चा रंगली आहे.
या विक्रेत्यांना नोटीस
टीव्हीएस शेलार ,खराडी
कुणाल एन्टरप्रायजेस, कोंढवा
सातव ऑटोमोबाइल्स , हडपसर
कोठारी व्हील्स, कोंढवा
पीआर ऑटोमोटिव्ह, मांजरी