Pune Crime News | कामगारांनीच चोरले 21 तोळे सोन्याचे दागिने, फरासखाना पोलिसांकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे : – Faraskhana Pune Police News | हॉलमार्क करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानातून आलेले 13 लाख 49 हजार रुपयांचे 21 तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेणाऱ्या टोळीला फरासखाना पोलिसांनी अवघ्या बारा तासात अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी दुकानात काम करणारे कामगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना बुधवारी (दि.1) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गणेश पेठेतील (Ganesh Peth Pune) न्यू त्रिशूल हॉलमार्कींग सेंटर या दुकानात घडली होती. (Pune Crime News)

लकी दत्तात्रय मोहीते (वय-19 रा. रेताळ वेश चौक, वांगी, सांगली), सचिन मोहन दडस (वय-24 रा. मु.पो. उबरगाव ता. आटपाडी, जि. सांगली), विशाल भागवत गोसावी (वय-21 रा. मु.पो. सराटी ता. इंदापुर), अतुल दत्तात्रय क्षीरसागर (वय-29 रा. माळीनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर), सुरज भगवान महाजन (वय-27 रा. संग्रामनगर, ता. माळशिरस जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सुलभा सुरेश माने (वय-48 रा. शनिवार पेठ, पुणे) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्या न्य त्रिशूल हॉलमार्किंग सेंटर येथे शहरातील वेगवेगळ्या सराफ दुकानातून दागिने हॉलमार्क करण्यासाठी येतात. 1 मे रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी हॉलमार्कसाठी आलेले दागिने चोरुन नेले. हा प्रकार लक्षात येताच फिर्यादी यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपास केला असता आरोपी माळशिरस भागात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी माळशिरस भागात आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरलेला सर्व मुद्देमाल जप्त करुन बारा तासात गुन्हा उघडकीस आणला.

आरोपी लकी मोहीते हा फिर्यादी यांच्या दुकानात कामाला आहे. त्याने याच दुकानात यापूर्वी काम करणाऱ्या सचिन दडस व विशाल गोसावी यांच्याशी संगनमत करुन दुकानात चोरी करण्याचा प्लॅन केला. आरोपींनी त्यांचे इतर मित्र अतुल क्षीरसागर व सुरज महाजन यांच्या मदतीने फिर्यादी यांच्या दुकानातून हॉलमार्कसाठी आलेले सोन्याचे दागिने चोरुन नेले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, निलेश मोकाशी पोलीस अंमलदार प्रवीण पासलकर, गौस मुलाणी यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.