Pune Hadapsar Crime | पुणे : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी ताब्यात

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Rape Case | एकमेकांसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून मुलगी सहा आठवड्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या दरम्यान पीडित मुलीच्या घरात घडला आहे. (Pune Hadapsar Crime)
याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि.20) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन यश सोमनाथ पवार Yash Somnath Pawar (वय-22 रा. फुरसुंगी, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 376, 376/2/एन, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.(Pune Hadapsar Crime)
सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने दोघांचे एकमेकांसोबत फोटो काढले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणाला काही सांगितले तर घरच्यांना जीवे मारण्याची धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबत कोणाला काहीएक सांगितले नाही. दरम्यान, पीडित मुलगी सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे तिच्या आजोळी गेली होती. त्याठिकाणी तिला त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी मुलगी सहा आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले.
यानंतर तिच्या आजोळच्या लोकांनी म्हसवड पोलीस ठाण्यात (Mhaswad Police Station) धाव घेतली. पीडित मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. म्हसवड पोलिसांनी आरोपी विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. हा प्रकार हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे म्हसवड पोलिसांनी गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास एपीआय नानासाहेब जाधव करीत आहेत.