OBC Leader Laxman Hake | काही मागण्या पूर्ण काही बाकी; लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित

0

जालना: OBC Leader Laxman Hake | ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं आहे. ओबीसी आरक्षणाचा कोटा (OBC Reservation Quota) मराठ्यांना देऊ नये या मागणीसाठी ते गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करत होते. जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्रीमध्ये त्यांचं उपोषण सुरु होतं. दुपारी सव्वा दोन वाजता शासनाचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले. शिष्टमंडळ आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर हाके यांनी उपोषण तूर्तास स्थगित केल्याची घोषणा केली.

शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी तब्बल दहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडले. दोन-तीन मागण्या सोडल्या तर सर्वच मागण्या पूर्ण झाल्या आहेत, सगेसोयरेचा आदेश आणखी आला नाही, तो सर्वपक्षीय बैठकीनंतर निघेल असे शासनाचे आश्वासन ग्राह्य धरून उपोषण स्थगित करण्यात आले आहे. इतर मागण्यांवर शासनाची श्वेत पत्रिका मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे हाके यांनी जाहीर केले.

आम्ही मागणी केलेल्या तीन मुद्यांची चर्चा होईल असे शासनाने लिखित स्वरूपात दिले आहे. तर आणखी दोन मुद्दे पूर्ण झाले नाहीत. यापुढे हे आंदोलन सुरूच राहील. विक्रमी वेळेत बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शासनाने बोगस प्रमाणपत्र काढणारे आणि देणारे या दोघांवर कारवाई करण्यात येईल असे शासनाने सांगितले आहे. पुढचा लढा पंचायतराज मधील ओबीसी आरक्षण सुरक्षित करण्याचा आहे. असेही हाके यांनी म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.