Dr Eknath Pawar | खबरदार! रुग्णांना बाहेरून औषधे आणायला लावली तर… ससूनचे नवे अधिष्ठाता डॉ. पवार यांची डॉक्टरांना तंबी

0

पुणे : Dr Eknath Pawar | कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात (Kalyani Nagar Car Accident Pune) आरोपीच्या रक्त नमुन्यात फेरबदल (Blood Sample Tampering Case Pune) केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) दोन डॉक्टर आणि शिपायास पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने या तिघांना सेवेतून निलंबित केले होते. तसेच रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ विनायक काळे (Dr Vinayak Kale) यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.

त्यानंतर त्या ठिकाणी बारामती येथील शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ चंद्रकांत म्हस्के (Dr Chandrakant Mhaske) यांच्याकडे ससून रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. आता डॉ. म्हस्के यांच्या जागी जे.जे रुग्णालयाचे (JJ Hospital) ऑर्थोपेडिक विभागप्रमुख डॉ. एकनाथ पवार यांना ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने काढले. दरम्यान डॉ. पवार यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला.

पदभार स्वीकारल्यांनंतर डॉ. पवार यांनी बैठकीत रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. रुग्णांना बाहेरून औषधे आणावयास सांगू नये. रुग्णांना औषधे लिहून देताना रुग्णालयात उपलब्ध असतील तीच औषधे द्यावीत. अशी तंबी डॉ. पवार यांनी दिली.

मागील काही दिवसांत ससूनमधील डॉक्टरांनी रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितल्याच्या घटना घडल्या होत्या. रुग्णांना रुग्णालयातच मोफत औषधे देण्याचे धोरण आधीपासून स्वीकारण्यात आले आहे. मात्र, काही डॉक्टर रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगतात, अशा तक्रारी वारंवार येतात. त्यामुळे डॉ. पवार यांनी पहिल्याच बैठकीत याची गंभीर दखल घेऊन असे प्रकार टाळण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिष्ठाता पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. पवार म्हणाले, मी याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे मला या संस्थेबद्दल आत्मीयता आहे. मागील काही काळात घडलेल्या घटनांमुळे संस्थेच्या लौकिकाला धक्का बसला आहे. संस्थेला पूर्वीचा लौकिक मिळवून देण्याचे माझे प्रयत्न असतील. ससून रुग्णालयातील रुग्णसेवा सुधारण्यास प्राधान्य दिले जाईल. रुग्णांना योग्य व वेळेत उपचार मिळावेत या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.