Bhide Wada Smarak | महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारीकरणाला गती; सुमारे 10000 चौ.मी.च्या भूसंपादनाला शासनाचा हिरवा कंदील

पुणे : Bhide Wada Smarak | शहराच्या मध्यवर्ती महात्मा फुले पेठेतील महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा एकत्रित विकास करण्यासाठी भूसंपादनाला गती मिळाली आहे. या दोन्ही स्मारकांच्या मध्यभागी असलेल्या घरांची जागा ताब्यात घेण्यासाठी लवकरच स्थानीक नागरिकांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) आणि शहर अभियंता प्रशांत वाघमारे (Prashant Waghmare) यांनी दिली.
शहराच्या मध्यवर्ती असलेल्या महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यासाठी महापालिका आणि राज्य शासन प्रयत्नशील आहे. सध्या ताब्यात असलेल्या फुले वाड्यासह काही अंतरावरच असलेल्या जागेवर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या दोन्ही स्मारकांच्या मध्ये निवासी भाग आहे. वर्षानुवर्षे याठिकाणी राहाणार्या नागरिकांचे पुनर्वसन अथवा त्यांना योग्य मोबदला देउन ही दोन्ही स्मारके जोडून आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी सुमारे १० हजार ९४२ चौ.मी. जागा लागणार आहे. या जागेवर आजमितीला जुनी घरे आणि वाडे असून तिथे ५१६ घर मालक तर २८६ भाडेकरू अशी सुमारे ८०२ कुटुंब वास्तव्यास आहेत.
या स्मारकाच्या विकसनासंदर्भात नुकतेच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये स्मारक परिसराच्याच्या आरक्षण मान्य करण्यात आले आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी आवश्यक जागेच्या संपादनाला सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी शासन निधी देणार आहे. यासंदर्भाने आज स्थानीक क्षेत्रिय अधिकारी आणि अभियंत्यांची बैठक घेतली. घर मालक आणि भाडेकरूंसोबत संवाद साधून भूसंपादनाचा तोडगा काढण्यात येईल. तत्पुर्वी संबधित घरमालक आणि भाडेकरूंना नोटीसेस पाठविण्यात येतील. सर्व संमतीनेच संपादनाची प्रक्रिया करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेेंद्र भोसले यांनी सांगितले.
शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले, की येथील घरमालक आणि भाडेकरूंसोबत संवाद साधण्यात येईल. यापुर्वीही काहीजणांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यावेळी काहींनी या परिसरातच त्यांच्या उपजिविकेचे व्यवसाय असल्याने याच परिसरात पुनर्वसन करावे, अशी मागणी केली. त्यादृष्टीने परिसरातील जागांचा सर्व्हे आणि योजनांचा विचार करून काय करता येईल, याची चाचपणी करण्यात येईल. लवकरच या प्रक्रियेला सुरूवात करण्यात येईल.
भिडे वाडा ऐतिहासिक स्मारकाची निविदा पुढील आठवड्यात
शिवाजी रस्त्यावरील समाधान चौकानजीकच्या ऐतिहासिक भिडे वाड्याच्या आराखड्याला पालकमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मान्यता दिली आहे. याठिकाणी फुले दाम्पत्याचे स्मारकच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी तीन मजली वास्तु उभारण्यात येईल. तळघरात दुचाकी पार्कींग असेल. तळमजल्यावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे. वरच्या मजल्यावर दोघांचे सामाजिक कार्य विविध भाषांमध्ये चलचित्रांच्या मार्फत पाहाण्याची, ऐकण्याची सुविधा निर्माण करण्यात येईल. वरच्या दोन मजल्यांवर ग्रंथालय आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याची व्यवस्था करण्यात येईल. या स्मारकासाठी सुमारे सात कोटी खर्च आहे. येत्या सोमवारी एस्टीमेट कमिटीमध्ये प्रकल्पाला मान्यता देण्यात येईल आणि लगेचच निविदा काढण्यात येईल, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि भवन रचना विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी दिली.