Court On Womens Number In Gents Toilet | पुरुष प्रसाधनगृहात महिलेचा नंबर लिहिणे हा लैंगिक छळ; कठोर कारवाईची गरज, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिपण्णी

0

बंगळुरू : Court On Womens Number In Gents Toilet | प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक म्हणून काम करत असलेल्या महिलेचा मोबाईल क्रमांक एका पुरूष शौचालयात कॉलगर्लचा नंबर (Callgirl Number) म्हणून लिहिण्यात आला होता. यानंतर सदर महिलेला अनेक कॉल येऊ लागल्याने तिला प्रचंड मनस्ताप झाला. तपासाअंती आरोपी सापडला. मात्र, त्याने आरोपपत्र रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीत कर्नाटक कोर्टाने म्हटले की, पुरुष प्रसाधनगृहाच्या भिंतींवर विवाहित महिलेचा नंबर लिहून कॉल गर्ल लिहिणे हा लैंगिक छळ आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीडित महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायक म्हणून काम करत होती. सरकारी कामासाठी तिने तिचा मोबाइल नंबर केंद्रातील अधिकाऱ्यांना दिला होता. अचानक तिला विविध क्रमांकांवरून वेळी अवेळी अनपेक्षित कॉल येऊ लागले.

कॉलवर काहींनी तिला शिवीगाळ केली, तर काहींनी धमकीही दिली. चौकशीत तिला समजले की, तिचा नंबर कॉल गर्ल नंबर म्हणून मॅजेस्टिक बस स्टॉप बंगळुरूच्या जेंट्स टॉयलेटमध्ये भिंतीवर लिहिलेला आहे.

यानंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तपास करून ३८ वर्षीय अल्ला बक्ष पटेल यास ताब्यात घेतले. पटेलविरुद्ध ५०१ (बदनामीकारक लिखाण), ५०४ (शिवीगाळ), ५०७ (निनावी फोनवरून धमकावणे) आणि ५०९ (विनयाचा अपमान) या गुन्ह्यांखाली आरोपपत्र दाखल केले.

यानंतर पटेल याने आरोपपत्र रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली. कलम ५०९ आयपीसीचा गुन्हा घडलेला नाही. कलम ५०४ आणि ५०७ ही कलमे अदखलपात्र आहेत असा युक्तिवाद केला.

यावर कोर्टाने निरीक्षण नोंदवताना म्हटले की, पुरुष प्रसाधनगृहाच्या भिंतीवर महिलेचा क्रमांक कोरणे आयपीसी ५०९ चा गुन्हा आहे. याचिकाकत्र्याने भिंतीवर नंबर लिहून महिलेचा अपमान केला आहे. सार्वजनिक ठिकाणी एका महिलेवर अशी तुच्छ टिप्पणी करून तो सुटू शकत नाही.

यावेळी न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी म्हटले की, आजच्या डिजिटल युगात शारीरिक इजा करण्याची गरज नाही. समाजमाध्यमांत निंदनीय विधाने, चित्रे किंवा व्हिडीओच्या माध्यमातून स्त्रीच्या शीलाचा अवमान होऊ शकतो. अशी प्रकरणे कठोरपणे हाताळली पाहिजेत.

Leave A Reply

Your email address will not be published.