Accidents In Pune | पुणे शहरातील रस्ते अपघातात वाढ! 5 महिन्यात 771 जणांचा बळी

0

पुणे : – Accidents In Pune | पुणे शहर झपाट्याने बदलत आहेत. याच पुण्यात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडी आणि अपघातात प्रमाण वाढलं आहे. सातत्याने होणार्‍या अपघातामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे. पुणे शहरात एकीकडे वाहनांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे असुरक्षित रस्त्यांची परिस्थिती यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुणे शहर मृत्यूचा सापळा कधी बनले हे समजलेच नाही.

पुणे शहरात वाहनांची संख्या वाढत असतानाही रस्त्याची रुंदी मात्र तशीच आहे. त्यातच वाहतूक नियमांचे पालन होत नसल्यामुळे अपघात वाढत आहेत. रस्त्यावरील वाढती गर्दी, हॉर्न आणि अचानक एखादा अवजड ट्रक वेगात जवळून निघून गेल्यावर अंगावर काटा येतो. त्यातच पीएमपी बस चालकांना अती घाई असल्याने ते वेगात गाडी चालवून अचानक ब्रेक दाबतात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकाला आणि समोरच्या वाहन चालकाला बसच्या चालकामध्ये यमाचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. सकाळी कामावर गेल्यानंतर पुन्हा घरी परत येईल का हे सांगता येत नाही. याला कारण आहे शहरातील वाढते अपघात.

अनेक अपघातात हजारोंचा मृत्यू

(Kalyani Nagar Car Accident) पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोर्शे कारचा अपघात झाल्यानंतर शहरात अपघातांची मालिकाच सुरु झाली आहे (Porsche Car Accident Pune). पोर्शे कार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्रसारमाध्यमांनी आणि पुणेकरांनी हे प्रकरण लावून धरल्याने या अपघाताची सखोल चौकशी पोलिसांनी केली. मात्र, असे कितीतरी अपघात पुणे शहर आणि परिसरात होतात, ज्याची कागदोपत्री नोंद होते. परंतु, निष्पन्न काहीच होत नाही. पुणे जिल्ह्यातील मागील काही महिन्यातील अपघातांची संख्या पाहिली तर 2024 मध्ये पुणे शहर पोलीस (Pune City Police) आणि ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) हद्दीत आतापर्यंत 771 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

पुणे ग्रामीणमध्ये सर्वाधिक मृत्यू

पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत 1 जानेवारी ते 31 मे 2024 या कालावधी तब्बल 1 हजार 072 अपघात झाले असून यामध्ये 602 जणांचा मृत्यू झाला आहेत. यात 888 मोठे अपघात आणि 484 दुचाकी वाहनांचे अपघात झाले आहेत. मोठ्या अपघातात 383 जणांनी प्राण गमावले आहेत. तर 667 जण जखमी झाले आहेत. दुचाकींच्या 484 अपघातांमध्ये 220 जणांचा मृत्यू झाला असून 365 जखमी झाले आहेत. पुणे ग्रामीणच्या हद्दीत 12 ‘ब्लॅक स्पॉट’ असून सर्वाधिक अपघात वडगाव मावळ परिसरात होतात.

पुणे शहराच्या हद्दीत 587 अपघात

पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत 1 जानेवारी ते 13 जून 2024 या कालावधीत अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघाताची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. सहा महिन्याच्या काळात पुणे शहरात 587 अपघात झाले. यामध्ये 169 जणांचा मृत्यू झाला तर 488 जण जखमी झाले आहेत. शहरातील कात्रज-कोंढवा, कात्रज-देहू बायपास या मार्गावर तसेच नवले पूल परिसरात अपघाताचे प्रमाण जास्त आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालवणे ही शहरातील अपघाताची प्रमुख कारणे आहेत.

अपघाताची प्रमुख कारणे कोणती?

  • अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणे
  • मद्यापान करुन वेगात गाडी चालवणे
  • नियमांचे पालन न करता वाहने चालवणे
  • सिग्नल तोडणे, फुटपाथवरून वाहने चालवणे, नो एन्ट्रीतून वेगाने जाणे
  • वेगमर्यादा न पाळणे
  • रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आणि वाहतूक नियमनासाठी पोलीस नसल्यामुळे
Leave A Reply

Your email address will not be published.