Bhigwan Pune Accident | पुण्यातील दुर्दैवी घटना! शाळेच्या पहिल्या दिवशी घरी आल्यानंतर 10 वर्षाच्या चिमुकल्यावर काळाची झडप

0

पुणे : – Bhigwan Pune Accident | शाळेचा पहिला दिवस असल्याने दहा वर्षाचा चिमुकला शाळेतून घरी आल्यानंतर तो आनंदात मोकळ्या मैदानात सायकल खेळत होता. त्यावेळी एका चारचाकी गाडीने त्याला चिरडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर घडली. समर्थ सुशील शिंदे (वय-10) असे अपघातात मृत्यू झालेल्या लहान मुलाचे नाव आहे.

समर्थ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सायकल खेळत होता. मंगळवारी (दि.18) सायंकाळी सहाच्या सुमारास सायकल खेळत असताना हा अपघात झाला. मोकळ्या मैदानावर चारचाकी वळण घेत होती. त्यावेळी समर्थ मागून आला आणि त्या गाडीला धडकला. धडक बसल्याने समर्थ खाली पडल्याने गाडी त्याच्या अंगावरुन गेली. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने तात्काळ उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. समर्थच्या अचानक जाण्यामुळे शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याप्रकरणी भिगवण पोलिसांनी कार चालक प्रेम मनोज भोसले (रा. भिगवण) याच्यावर गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर तो फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मंगळवारी शाळेचा पहिला दिवस होता. शाळेतून आल्यानंतर तो मोकळ्या मैदानात सायकल खेळत असतानाच काळाने त्याच्यावर झडप घातली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.