Madha Lok Sabha Election Results | माढ्यात मोदी, फडणवीसांनी ताकद लावली पण, तरीही भाजपाचा पराभव; जाणून घ्या

0

अकलूज: Madha Lok Sabha Election Results | मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे म्हणत भाजपने (BJP) तिसरी लोकसभा लढवली. मोदींच्या चेहऱ्यावर कुणालाही हमखास निवडून आणता येते, असा विश्वास तयार झाला होता. पण २०२४ मधील लोकसभा त्याला अपवाद ठरली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेच्या काळात महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांनी राज्यात प्रत्येक टप्प्यात तळ ठोकला. राज्यात १९ सभा, रोड शो आणि सर्व यंत्रणा दिमतीला असताना पण मोदी मॅजिक काही चालले नाही. राज्यात ज्या ठिकाणी मोदींच्या सभा झाल्या. त्यातील फार थोड्या उमेदवारांना विजयाचा आनंद चाखता आला. इतरांना पराभावाचे तोंड पाहावे लागले.

विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले होते. त्यांची हीच नाराजी हेरत शरद पवारांनी (Sharad Pawar) संधी साधली आणि मोहिते पाटलांना राष्ट्रवादीत आणत रिंगणात उतरवले. त्यानंतर फडणवीस यांनी बरीच राजकीय गणितं जुळवून आणली. पण, त्याचा फायदा झाला नाही.

माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. रणजित सिंह नाईक निंबाळकर हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. पक्षातून आणि मित्रपक्षातून विरोध असतानाही भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी मोदींची सभा झाली होती. त्यांचा १,२०,८३७ मतांनी पराभव झाला. शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांना ६,२२,२१३ मते मिळाली.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठं मताधिक्य घेऊन विजय मिळवला. १ लाख २० हजाराहून अधिक मताधिक्य मोहिते पाटील यांनी घेतले. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. कारण या मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सभा घेतली होती. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील या मतदारसंघात सभांचा आणि बैठकांचा धडाका लावला होता. मात्र, सर्व नेते एकीकडे आणि जनता एका बाजूला झाल्याचे चित्र माढा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाले.

माढा लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यातील तीन तालुक्यात धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठं मताधिक्य मिळाले आहे. तर रणजितसिंह निंबाळकरांनी तीन तालुक्यात मताधिक्य मिळाले आहे. मात्र, निंबाळकरांना मिळालेले मताधिक्य अल्प प्रमाणात आहे.

विशेष म्हणजे मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या शिंदे बुंधुंच्या बालेकिल्ल्यातच मोहिते पाटलांना आघाडी मिळाली आहे. माढा आणि करमाळा तालुक्यात मोहिते पाटलांनी मोठं मताधिक्य मिळाले आहे. माढ्यात मोहिते पाटलांना ५०,००० हून अधिकचा लीड मिळाला आहे. तर करमाळा मतदारसंघातून ४१००० हून अधिकचा लीड त्यांना मिळाला आहे.

मतदारसंघ – धैर्यशील मोहिते पाटील – रणजितसिंह निंबाळकर – मताधिक्य

माढा – 122570 70055 52515
करमाळा – 94469 55958 41511
माळशिरस – 134279 64145 70134
माण – 86059 109414 23355
फलटण – 93633 110561 16928
सांगोला – 84556 89038 4482

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?

माढा – बबनदादा शिंदे – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
करमाळा – संजयमामा शिंदे – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
सांगोला – शहाजीबापू पाटील – शिवसेना शिंदे गट
माळशिरस – राम सातपुते – भाजप
माण खटाव – जयकुमार गोरे – भाजप
फलटण – दिपक चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

Leave A Reply

Your email address will not be published.