Ajit Pawar On Drones Flying In Pune Rural | ड्रोनच्या माध्यमातून घरफोड्या? बारामतीसह दौंड, इंदापूर तालुक्यातही ड्रोनचा धसका; अजित पवारांनी घेतली गंभीर दखल

0

बारामती: Ajit Pawar On Drones Flying In Pune Rural | बारामती (Baramati) भागात दिवसा व रात्री गावात ड्रोन फिरला की दुसऱ्या दिवशी एखाद्या घरात हमखास घरफोडी चोरी होऊन चोरटयांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. या घटना बारामती तालुक्यात न राहता दौंड (Daund), इंदापूर (Indapur) या शेजारील तालुक्यांनीही या उडणाऱ्या ड्रोनचा धसका घेतला आहे.

अनेक गावात घरांच्या वरून लाईटचा प्रकाश असणारे घिरट्या मारणारे नक्की ड्रोन की इतर काही आहे याबाबत चर्चांना उधाण आले आहे. चोरटे चोरी करण्यासाठी ड्रोनचा वापर करतायत का ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरफोडीच्या घटनांनी वाढ झालेली आहे. चोरटे घरफोडी करत चोरी करुन प्रसार होत असल्याच्या घटना मागील काही दिवसांपासून सातत्याने घडत आहेत.

दरम्यान परिसरात रात्रीच्या सुमारास ड्रोन कॅमेरे घरासमोरून फिरत असल्याचे अनेक नागरिकांना दिसले आहे. चोरटे ड्रोन कॅमेरा चा वापर करून घरात किती व्यक्ती आहेत? हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ते ड्रोन कॅमेराचा वापर करीत असावेत अशी शंका नागरिक उपस्थित करू लागले आहेत. हे ड्रोन कॅमेरे आहेत का आणखी दुसरे काही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान या सर्व प्रकारांचा पोलीसांनी पुरेपूर तपास लावावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान, याबाबत पोलिसांशी नागरिकांनी संपर्क साधल्यास घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत ते शिकाऊ विमानाच्या लाईट असल्याचे सांगून अंग झटकून दिले जात आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी परिसरात घरफोड्या झाल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे बारामतीचे पोलीस या ड्रोन चा शोध लावण्यास अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

नागरिकांकडून ड्रोन कॅमेरेच्या संदर्भात तक्रारी आल्यांनतर पोलिसांनी त्याची काही ठिकाणी खात्री केली पण ते ड्रोन कॅमेरे असल्याचे आढळून आले नाही. तरीही पोलीस त्या अनुषंगाने सखोल तपास करीत आहेत. मात्र नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात असतानाच घरफोड्या चोऱ्या होऊ लागल्या आहेत. यामुळे हा नक्की काय प्रकार चालू आहे हे न उलघडणारे कोडे झाले आहे.

या घटनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल दखल घेतली आहे. बारामतीच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. यानंतर पवार यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना फोनद्वारे या ड्रोन उडवणाऱ्या आरोपींचा व घडणाऱ्या घटनांचा लवकरात लवकर तपास लावून नागरिकांना दिलासा देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.