Ambadas Danve | मोठी बातमी : ईव्हीएम हॅक करण्यासाठी हॅकरने मागितले अडीच कोटी, अंबादास दानवेंनी तक्रार केल्यानंतर आरोपीला रंगेहाथ अटक

0

संभाजीनगर : Ambadas Danve | ईव्हीएम मशीन हॅक होत नाही, असे निवडणूक आयोग नेहमीच सांगत असतो. मात्र, काही लोक याबाबत नेहमीच विविध दावे-प्रतिदावे करत असतात. अशाच प्रकारे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना एका व्यक्तीने संभाजीनगरमधील सर्व ईव्हीएम हॅक करून हवा तसा निकाल लावून देतो, असे सांगत अडीच कोटींची मागणी केली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने दानवे यांनी तक्रार केली. त्यानंतर एक लाख रुपये स्वीकारताना आरोपीला सापळा रचून संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) गोल्डन हॉटेलमधून पोलिसांनी अटक केली आहे.

मारुती ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पुणे पोलिसांच्या (Pune Police) आर्थिक गुन्हे शाखेने (Pune EoW) ही कारवाई केली. मारुती ढाकणे हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील आहे. विशेष म्हणजे तो सैन्यात हवालदार म्हणून आहे.

ढाकणे याने संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election 2024) जेवढे एव्हीएम आहेत, ते सर्व हॅक करतो, आणि तुम्हाला हवा तसा निकाल देतो, असे आश्वासन अंबादास दानवेंना फोनवरून दिले. या कामासाठी त्याने अडीच कोटी रुपयांची मागणी केली. मात्र, हा प्रकार संशयास्पद वाटल्याने दानवे यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

यानंतर आरोपीला अडीच कोटीपैकी एक लाख रुपये घेण्यासाठी बोलावण्यात आले, यावेळी पोलीसांनी सापळा लावला होता. अंबादास दानवे यांच्याकडे पोलिसांनी पैसे दिले. यानंतर पुण्यातील गोल्डन हॉटेलमधून मारुती ढाकणेला पैसे घेताना रंगेहात पकडले. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा ईव्हीएम हॅक होण्याचा मुद्दा समोर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.