Ajit Pawar On Supriya Sule | सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची विकासकामांवरून टीका, मी केलं, मी केलं, मी केलं…

0

आंबेगाव : Ajit Pawar On Supriya Sule | मी केलेली विकासकामे सुळे यांनी आपल्या प्रचार पुस्तकात छापली आणि त्याचे श्रेय घेतले. मी केलं, मी केलं, मी केलं, अशी टीका अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंची नक्कल करत केली. भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्याच्या (Mulshi Taluka) पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी, आंबेगाव परिसरात एमआयडीसी आणणार असल्याचे आश्वासन देखील मतदारांना दिले.

अजित पवार म्हणाले, सुप्रिया सुळेंच्या प्रचार पुस्तकांत मी केलेली कामे छापण्यात आले आहेत. ही सगळी कामे त्यांनी केल्याचे सध्या दाखवले जात आहे. बारामतीतील सगळ्या इमारती मी बांधल्या आहेत. मात्र फोटो त्यांच्या पुस्तकांत दिसत आहे. (Baramati Lok Sabha)

ते पुढे म्हणाले, सुप्रिया सुळे मी केलेल्या कामांचे श्रेय घेत आहेत. ही कामं केली असतील तर भोर, वेल्हा आणि मुळशीत काय केले ते दाखवा. नुसती भाषणे करु होत नाही. भाषणे केल्याने जनतेचे पोट भरणार नाही त्यासाठी कृती करावी लागेल.

अजित पवार म्हणाले, भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील तरुणांना नोकरीत आरक्षण देण्याची मागणी आहे. मग बारामती, इंदापूर आणि दौंड मधील तरुणांनी काय घोडं मारलं आहे का? मी तुमचा विकास करेन पण तुम्हाला घड्याळाच्या चिन्हासमोरचे बटन दाबावे लागेल, असे आवाहन पवार यांनी मतदारांना केले.

अजित पवार म्हणाले, आधीचा खासदार मोदी साहेबांना विरोध करायला जायचा. आताचा खासदार मोदी साहेबांना मदत करायला जाईल. मोदींचे बजेट खूप मोठे आहे. आधीच्या खासदारांनी मोदींना विरोध केल्याने मतदारांचे नुकसान झाले, असा आरोप देखील त्यांनी केला.

विरोधकांवर टीका करताना अजित पवार म्हणाले, काहीजणांनी वल्गना केल्या की निवडून आल्यावर भोर- वेल्ह्यात इंडस्ट्री आणू. मग आतापर्यंत का आणली नाही. भावनिक न होता मतदान करा. मला विकास करण्याचा अनुभव आहे. मी रात्री एक वाजता झोपलो तरी सकाळी सहाला कामाला सुरुवात करतो. मी ढगात गोळ्या मारत नाही, खोटे बोलत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.