Pune PMC News | टँकरने होणारी पाण्याची ‘चोरी’, ‘धंदा’ आणि ‘गळती’ला महापालिकेचा लगाम ! रामटेकडी आणि वडगाव शेरी टँकर भरणा केंद्राचे ‘ऍटोमायझेशन’ सुरू

वरिष्ठ अधिकार्‍यांना कार्यालयात बसून पाहाता येणार ‘ऑनलाईन’ नोंदी आणि दृश्य

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune PMC News | शहराच्या पूर्व भागातील टँकरने पुरविण्यात येणार्‍या पाण्याची ‘चोरी’, ‘धंदा’ आणि ‘गळती’ला आता लगाम बसणार आहे. महापालिकेच्या लष्कर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने पूर्व भागातील रामटेकडी आणि वडगावशेरी येथील टँकर भरणा पॉईंटचे अधुनिकीकरण (ऍटोमायझेशन)करण्यात येणार आहे. याअंतर्गत टँकरमध्ये पेट्रोल पंपाप्रमाणेच मोजूनच पाणी सोडण्याची अधुनिक यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर, संगणकावर पावत्या आणि ही सर्व यंत्रणा कमांड कंट्रोलच्या माध्यमातून नियंत्रीत करतानाच अधिकार्‍यांच्या मोबाईलवरही दिसणार आहे. (Pune PMC News)

शहराच्या पूर्व भागातील हडपसर, मुंढवा, केशवनगर आणि वडगाव शेरी परिसरात रामटेकडी आणि वडगाव शेरी येथील टँकर भरणा केंद्रावरून दररोज पाणी पुरवठा करण्यात येतो. प्रामुख्याने रामटेकडी परिसरातून कचरा डेपोमुळे बाधीत झालेल्या देवाची उरूळी, फुरसुंगीसोबतच पाणी पुरवठ्याची प्रभावी यंत्रणा नसलेल्या औताडे हांडेवाडी, मांजरी, शेवाळवाडी, केशवनगर, महंमदवाडी, कोंढवा परिसरात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. सध्या या ठिकाणी एकावेळी दहा टँकर पाणी भरू शकतात अशा दहा स्टॅम्पपोस्ट आहेत. सकाळी सात वाजता येथील भरणा केंद्र सुरू होते. (Pune PMC News)

या केंद्रावरून दररोज ४०० टँकरच्या फेर्‍या होतात. यापैकी महापालिकेने निविदा काढलेल्या ३६० फेर्‍यांसोबतच खाजगी व महापालिकेच्या टँकरच्या देखिल फेर्‍या होतात. साधारण या एकट्या केंद्रातून दररोज साडेतीन एमएलडी पाणी पुरवठा होतो. सध्या याठिकाणी तीन ठेकेदार काम करत आहेत. वनविभागाच्या जागेमुळे खाजखळग्यांचा रस्ता असल्याने स्टँम्पपोस्ट खाली टँकर उभे करणे आणि टँकर भरणे यामध्ये दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी होते. या पाण्यामुळे रामटेकडी इंडस्ट्रीयलमधील दोन रस्ते पुर्णपणे चिखलमय झालेले आहेत. सकाळी केंद्र सुरू करत असताना फ्लो मीटरवरील नोंदी घेतल्या जातात आणि रात्री बंद करताना नोंद घेतली जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती आढळते.

टँकर पॉईंटबाबत तक्रारी

टँकर पॉईंटवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.
सर्व नोंदी आणि पावत्या हाताने केल्या जातात.
महापालिकेच्या कर्मचार्‍यांनीच कुटुंबियांच्या नावे टँकर घेतले असून त्यांचे चलन केले जात नसल्याचे आरोप.
टँकर भरताना आणि खड्डेमय रस्त्यातून बाहेर काढताना मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी.
टँकर भरल्यानंतर झाकणे न लावल्याने हेंदकळुन पाणी बाहेर येत असल्याने रामटेकडीतील रस्ते दिवसभर ओले राहून निसरडे होतात. यामुळे अपघातही वाढले आहेत.

अधुनिकीकरणांत काय करणार?

रामटेकडी येथे ११ तर वडगावशेरी येथे पाणी भरण्यासाठी चार अधुनिक स्टॅम्पपोस्ट उभारणार.
या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यात आली असून तिला पाणी मोजण्यासाठी नवीन फ्लो मीटर बसविणार.
प्रत्येक स्टॅम्प पोस्टला संगणीकृत यंत्रणा बसविण्यात येणार असून टँकरच्या क्षमतेनुसार मोजूनच पाणी मिळणार. टँकरच्या क्षमतेनुसार पाणी सुटल्यानंतर पाण्याचा प्रवाह ऑटोमेटीक बंद होणार.
प्रत्येक स्टँम्प पोस्टवर व परिसरात सीसीटीव्ही बसविणार.
या यंत्रणेवर नियंत्रण ठेवणारी स्काडा सिस्टिम अनुक्रमे रामटेकडी आणि वडगावशेरी येथील केंद्रावर विकसित करण्यात येणार्‍या कमांड सेंटरमध्ये पाहाता येणार आहे.

कमांड सेंटरमधील प्रत्येक नोंदी वरिष्ठ अधिकार्‍यांना मोबाईलवर पाहाता येणार.

टँकर भरणा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होते, हे निदर्शनास आल्याने रामटेकडी आणि वडगावशेरी येथील केंद्राचे अधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनाही मोबाईलवर प्रत्येक नोंदी आणि केंद्रावरील हालचाली पाहाता येणार आहेत. या सिस्टिममुळे शिस्तीसोबतच पाण्याचा अपव्यय टाळण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमासाठी सुमारे ६० लाख रुपये खर्च असून काम सुरू देखिल करण्यात आले आहे.
पुढील दीड ते दोन महिन्यांत ही सर्व यंत्रणा कार्यन्वीत होईल.

वनविभागाच्या जागेमुळे रस्त्याचे काम करण्यात अडचणी आहेत. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
टँकरच्या मालकीबाबत तक्रारी आल्या आहेत, त्यांची खातरजमा करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
रामटेकडी आणि वडगावशेरी येथील भरणा केंद्रांचे काम झाल्यानंतर
शहरातील सर्वच टँकर भरणा केंद्रांचे संचलन अधुनिक यंत्रणेद्वारे करण्यात येणार आहे.
टँकरमधून रस्त्यार सांडणारे पाणी आणि त्यामुळे वाहनचालकांना
सहन करावा लागत असलेला त्रास निदर्शनास आल्यानंतर टँकरचे झाकण बंद करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
टँकरचे झाकण उघडे असल्याचे निदर्शनास आल्यास संबधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

– इंद्रभान रणदिवे, अधीक्षक अभियंता, महापालिका पाणी पुरवठा विभाग, लष्कर विभाग.

Leave A Reply

Your email address will not be published.