Maharashtra Monsoon Session | ‘आता ही आग कुठपर्यंत जाईल, याचा काही नेम नाही’; लिफ्टमधील भेटीनंतर शिंदे गटाचे वक्तव्य

0

मुंबई : Maharashtra Monsoon Session | आज विधानभवनाच्या लिफ्टमध्ये एकाच वेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Sirsat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडीला सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांनी काल त्यामध्ये काडी टाकली आहे. आता ही आग कुठपर्यंत जाईल सांगता येत नाही.

महाविकास आघाडी टिकणे शक्य नाही हे स्पष्ट झाले असून त्याची सुरुवात आजपासून झाली आहे असे शिरसाट यांनी म्हंटले आहे. विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे असावेत असे भाष्य नुकतेच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. मात्र तसा प्रस्ताव काँग्रेस स्वीकारेल असे वाटत नसल्याचे शिरसाटांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वज्रमुठ सभा झाल्या. त्यात खुर्चीमधील बदल उद्धव ठाकरे यांना आवडत नव्हता. त्यामुळे एके वेळेला आघाडी तुटेल पण मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर येणार नाही, असे मत शिरसाट यांनी व्यक्त केले. काँग्रेस नेत्यांकडून याविषयी कोणतेही भाष्य केले जाणार नाही कारण आता राज्यात काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत आले आहेत. त्यांना स्वतंत्र लढायची खुमखुमी आली आहे.

त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये राहील की नाही हेच पाहण्यासारखे आहे. महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक शरद पवारांच्या नेतृत्वात लढली होती उद्धव ठाकरे यांच्या नाही. त्यांनी शरद पवारांचा चेहरा वापरला होता, असेही शिरसाट म्हणाले.

उद्धव ठाकरे व चंद्रकांत पाटील यांची भेट झाली याचा अर्थ आमचे काही वैयक्तिक भांडण नाही. उद्धव ठाकरे यांना संजय राऊत चुकीचे मार्गदर्शन करत असल्याचा प्रत्यय आला असेल. राजकीय भांडण वेगळे आणि व्यक्तिगत संबंध वेगळे. प्रत्येकाचे प्रत्येकाशी असतात आणि ते कधी तुटू नयेत.

बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे तुमचे पोटभेद असावेत मनभेद नसावेत. त्याचे उदाहरण आज पाहायला मिळाले. महाराष्ट्राची संस्कृती जपायचे काम अशा नेत्यांनी केले पाहिजे त्याचा चांगला संदेश समाजात जातो यात काही गैर वाटत नाही, असे मत शिरसाट यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.