PMPML Accident At Pulgate Pune | अर्धा तास गाडीचे चाक पोटावरच; तरुणाचा तडफडून मृत्यू , पीएमपीएमएलचा ढिसाळपणा समोर

0

पुणे : PMPML Accident At Pulgate Pune | पुणे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पुलगेट येथे पीएमपीएमएलच्या बसने जोरात धडक दिल्याने यश कसबेकर (वय २१) याचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला ड्रायव्हरसह संपूर्ण पीएमपीएमएल प्रशासन जबाबदार असल्याचे दिसून आले.

१३ जून रोजी सायंकाळी ९:३० च्या दरम्यान महात्मा गांधी बसस्थानकात पीएमपीएमएल विभागाची वातानुकूलित इलेक्ट्रिक (बस क्र.एमएच १२ टीव्ही ३८१४) चा चालक स्वप्निल काळूराम जगताप (३२, रा. पुरंदर) याने भरधाव वेगाने गाडी चालवत यश विष्णू कसबेकर (वय २१, रा.कोंढवा) याला जोरात धडक दिली.

अपघात झाला आहे हे माहीत असतानाही बसचालकाने गाडी मागे घेतली नाही. अर्धा तास गाडीचे चाक मुलाच्या पोटावरच असल्याने त्या युवकाचा अक्षरशः तडफडून मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, एवढ्या महत्त्वाच्या स्थानकावर बसचे नियमन करणारे शिट्टी वाजवत बस स्थानकावर उभे राहणारे कर्मचारी आणि बसस्थानकाचे सुरक्षारक्षक हे त्या ठिकाणी नव्हते. ते त्या ठिकाणी असते तर मुलाचा जीव वाचू शकला असता. त्यांच्यावरही गुन्हे दाखल व्हावेत, अशा भावना परिसरातील नागरिकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

या घटनेबाबत पीएमपीएमएल प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी चालकाने बस मागे घेतली नाहीच तसेच त्याला रुग्णालयात नेण्याचाही प्रयत्न केला नाही. स्थानकात उपस्थित असलेले नागरिक अपघाताचा व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते. जवळपास अर्धा तास तरुण तडफडत होता आणि शेवटी त्याने जीव सोडला अशी माहिती प्रत्यक्षदर्शी एका वृद्ध व्यक्तीने दिली आहे.

“आमचा मुलगा जो गेला त्याला पीएमपीएमएल प्रशासनच जबाबदार आहे. प्रशासनाचे ड्राइव्हर , स्टार्टर , सुरक्षारक्षक यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. जेणेकरून इतर कोणावर अशी वेळ येणार नाही. अशी प्रतिक्रिया मृत तरुणाचे नातेवाईक असलेलया पौर्णिमा भोसले यांनी दिली आहे. पुलगेट स्थानकात गाडी आणताना बसचालक अतिशय वेगात गाडी आणतात. पीएमपीएमएल प्रशासनाचे कोणतीही नियंत्रण नाही. इलेकट्रीक बस असल्याने स्थानकात ती आल्याचे नागरिकांना जाणवत नाही. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.