Maharashtra Assembly Elections 2024 | शरद पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग! ‘या’ दोन नेत्यांवर मोठी जबाबदारी

0

पुणे : Maharashtra Assembly Elections 2024 | लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा (Sharad Pawar NCP) आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभेला १० पैकी ८ जागांवर शरद पवार गटाचे खासदार निवडून आले. दरम्यान शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची पुण्यातील निसर्ग हॉटेलला बैठक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत विधानसभेच्या दृष्टिकोनातून नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभेच्या यशानंतर आता आगामी विधानसभा निवडुकांची तयारी शरद पवारांनी सुरु केलेली आहे. शरद पवार आसपासच्या तालुक्यात गावभेटी दौरे करत शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. आता पक्षातील नेत्यांनाही त्यांनी जबाबदारी देऊन सूचना केल्याची माहिती आहे.

शिरूर लोकसभेत शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांचा पराभव केल्यानंतर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याकडे मोठी जबाबदारी पवारांनी सोपवली आहे. महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून ते प्रचार करणार आहेत. अमोल कोल्हे यांनी मालिकेतून ब्रेक घेतल्यानंतर लाइव्ह शोच्या माध्यमातून हा प्रचार होणार आहे. तर सुप्रिया सुळे यांना महिला आघाडीच्या माध्यमातून राज्यभर महिला मेळावा घेण्याच्या सूचना आहेत.

अशा दोन खासदारांना राज्यव्यापी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उतरवलेल्या दहा उमेदवारांपैकी आठ जण शरद पवार गटाचे खासदार म्हणून निवडून आले. या आठ खासदारांना आपापल्या मतदारसंघातील विधानसभांची जबादारी देण्यात आली आहेच. त्यासोबतच राजेश टोपे (Rajesh Tope) यांना मराठवाड्याची, तर अनिल देशमुख यांना विदर्भाची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.