Pune Crime News | पुणे: रिल बनवण्याच्या नादात जीवाशी खेळ, उंच इमारतीवर तरुणाचा हात पकडून तरुणी हवेत लटकली; पुण्यातील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

0

पुणे : Pune Crime News | आजचं युग हे सोशल मीडियाचं (Social Media) युग आहे. अनेकांच्या हातात सध्या स्मार्ट फोन आले आहेत. यावर फेसबुक आणि इंस्टाग्राम चालवत असतात. विशेषत: इंस्टाग्रामने तर लोकांना अक्षरश: वेड लावले आहे. इन्स्टाग्रामवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कुठे रील बनवतील याचा नेम नाही. मात्र, रील बनवत असताना ती जागा कोणती आहे, आपल्या जीवाला धोका होईल का याचे भान राहत नाही आणि प्रसंगी जीव गमवावा लागतो. अशा अनेक घटना घडत असतात. सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून एका उंच इमारतीवर तरुणाचा हात पकडून एक तरुणी हवेत लटकत असल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे.

रील तयार करण्यासाठी ताकद आणि पकड तपासत असल्याचे व्हायरल व्हिडीओत लिहिल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ (Swami Narayanan Temple Pune) असलेल्या एका उंच इमारतीवर ही तरुणी स्टंट करताना दिसत आहे. ही तरुणी इमारतीवरुन खाली लटकली आहे, तर वरती असलेल्या तरुणाने तिचा हात पकडला आहे. चुकुन जर हात निसटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.

हा व्हिडीओ पुणे-सातारा रोडवरील (Pune Satara Road) आहे. तरुण-तरुणी गोलाकार असलेल्या वास्तूवर चढून ही स्टंटबाजी करताना दिसत आहेत. यावेळी आणखी एक तरुण दिसत असून तो व्हिडीओ काढत आहे. रील बनवण्याची पूर्ण तयारी करुन हे तरुण या वास्तूवर चढल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जीव धोक्यात घालून रील बनवणाऱ्या तरुणांवर पोलीस काय कारवाई करतात हे पहावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.