CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | शिवसेनेचा मूळ मतदार कोणाकडे? मुख्यमंत्री शिंदेंचा दावा उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढवणारा; थेट आकडेच सांगितले

0

मुंबई: CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) राज्यात महायुतीच्या (Mahayuti) तुलनेने महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) चांगले यश मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP) अशा दोन्ही गटात फूट पडली. त्यामुळे गटांच्या तुलनेत कोणाचे पारडे जड अशा चर्चा सुरु आहेत.

शिवसेना पक्षातून एकनाथ शिंदे काही नेत्यांना घेऊन बाहेर पडले तसेच त्यांनी पक्षावर दावाही केला. लोकसभा निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (Shivsena UBT) अशी ओळख घेऊन दोघेही मतदारांपुढे गेले. मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांवर भाष्य केले आहे.

शिंदे म्हणाले, ” कोकणात उबाठा साफ, ठाणे, कल्याण, पालघर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही उबाठा साफ. मुंबईत चार जागा कशामुळे गेल्या हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. आपण १३ जागा समोरासमोर लढलो. त्यातील ७ जागा आपण जिंकल्या. यात उबाठाचा स्ट्राईक रेट आहे ४२ टक्के, तर आपला ४७ टक्के आहे. त्यांना १३ जागांवर ६० लाख मते मिळाली, तर आपल्याला ६२ लाख मते मिळाली. आपल्या १५ उमेदवारांना ७४ लाख मते मिळाली.

अर्थात सरासरी ४ लाख ९३ हजार मते मिळाली. त्यांच्या २१ उमेदवारांना किती मते मिळाली? तर ४ लाख ५० हजार. म्हणजेच आपण सगळीकडे उबाठापेक्षा सरस आहे. खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, धनुष्यबाणाची शिवसेना आणि तुमच्या सर्वांची शिवसेना सरस ठरली. खरी शिवसेना कोणाची आहे? याचा निकाल जनतेनेच दिला आहे ” असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे संपणार, शिवसेना संपणार, असे काही लोक बरळत होते. मात्र, या राज्यातल्या मतदारांनी त्यांचे दात घशात घातले. हा शिंदे संपला नाही, हा एकनाथ शिंदे जिंकला तुमच्या साथीने. माझ्या या व्यासपीठावरील सहकाऱ्यांच्या आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या साथीने हा एकनाथ शिंदे जिंकला आणि यापुढेही जिंकत राहील “, असा इशाराही शिंदे यांनी यावेळी विरोधकांना दिला.

“अरे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. तुमचं आणि या महाराष्ट्रातील जनतेचं प्रेम माझ्यावर आहे. आणि हे प्रेम जोवर माझ्यासोबत आहे. तोवर हा एकनाथ शिंदे कधीही घाबरणार नाही. कधी घाबरला नाही. ज्या प्रकारचं धाडस या देशात कुणी केलं नाही, ते धाडस एकनाथ शिंदेने करून दाखवलंय. यामुळे भीती माझ्या रक्तात नाही. माझ्या शब्दकोशात नाही ” असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.