Dattatray Bharne | आमदार दत्तात्रय भरणे यांना सायबर चोरट्यांनी बनवलं ‘मामा’, अपघाताची बतावणी करुन घातला गंडा

0

पुणे : – Dattatray Bharne | दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Cheating Fraud Case) घटना वाढत आहेत. डिजीटल पेमेंट मध्ये सायबर चोरीच्या (Cyber Thieves) प्रकरणात वाढ झाली आहे. वयोवृद्ध नागरिक, उच्च शिक्षित सायबर चोरट्यांच्या जाळ्यात सापडतात. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार दत्तात्रय भरणे यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी भरणे यांना इमोशनल करुन ऑनलाइन पैसे घतले. या प्रसंगाचा किस्सा खुद्द भरणे यांनी पोलिसांबरोबर झालेल्या एका बैठकीत सविस्तर सांगितला आहे. तसेच इतरांनी खबरदारी घ्यावी, असाही सल्ला भरणे यांनी दिला आहे.

काय आहे प्रकरण?

भरणे यांनी सांगितले की, मला एक फोन आला. समोरच्या व्यक्तीने सांगितले की, मामा आमच्या गाडीचा इंदापूर रोडवर अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या दोन लोकांचा जागीच मृत्यू झाला असून इतर लोक रुग्णालयात आहे. आम्हाला औषधोपचारासाठी ताबडतोब 15 हजारांची गरज आहे. मतदारसंघातील लोक असावेत, असे वाटल्यामुळे मी त्यांची चौकशी केली.

त्यांनी पुढे सांगितले, फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने मला भावनिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि ताबडतोब पैसे पाठवा अशी विनंती केली. मी रुग्णालयात माणसाकरवी पैसे पाठवतो असे सांगितल्यावर त्यांनी नातेवाईकांबरोबर बाहेर आलोय, असे सांगण्याचा बनाव केला. आमच्या रुग्णवाहिकेत डिझेल भरायला पैसे नाहीत, असेही त्याने सांगितले. मग मला एक नंबर देऊन मोबाईलवर पैसे पाठवण्याची विनंती केली. मीही कार्यकर्त्याच्या मोबाईलमधून त्यांना 15 हजार पाठवले.

पैसे पाठवल्यानंतर काही वेळाने इंदापूरला अपघात झाला आहे का याची चौकशी केली. मात्र, तालुक्यात अपघातच झाला नसल्याची माहिती मिळाली. तेव्हा आपण गंडलो गेलो याची कल्पना आल्याचे आमदार भरणे मामा यांनी सांगितले. केवळ मलाच नाही तर इतर आमदारांनाही अशाच प्रकारे फसवण्याचा प्रयत्न झाल्याचे भरणे यांनी सांगितले.

चोरटे आता पुढे गेले आहेत. मोबाईलवर दुरुनही चोरी करता येते. त्यामुळे पोलिसांनी अशावेळी अधिक जागृत राहण्याची गरज आहे. नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षा कशी पुरवता येईल, याचा प्रयत्न करावा, असे निर्देश आमदार दत्तात्रय भरणे यांनी पोलिसांना दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.