Kondhwa Pune Crime News | पुणे : कोंढव्यातील दुर्घटनेप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

0

पुणे : – Kondhwa Pune Crime News | कात्रज-कोंढवा रस्ता (Katraj Kondhwa Road) परिसरात रुंदीकरण तसेच समतल विलगकाच्या (ग्रेड सेपरेटर) कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाण्यात चार मुली पडल्या. यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला तर तीन जणींना वाचवण्यात यश आले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 8 जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास महाकाली मंदिराजवळ (Mahakali Mandir Pune) घडली होती.

याबाबत जगदीश छगन शिलावट (वय-35 रा. केसर लॉज मागे, महाकाली मंदिराजवळील मोकळ्या मैदानात, कोंढवा बु) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन खडीमशिन चौक ते कात्रज कडे जाणाऱ्या नवीन रोड तयार करणाऱ्या ठेकेदारावर आयपीसी 304(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

शिलावत कुटुंबीय चाकू, सुरीला धार लावून देण्याचे काम करतात. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील मोकळ्या जागेत ते झोपडी बांधून राहतात. रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास सरगम जगदीश शिलावत (वय-15), जनुबाई रमेश शिलावत (वय-16), तेजल जगदीश शिलावत (वय-12), मुस्कान देवा शिलावत (वय-16) या चौघी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.

त्यावेळी मुस्कान खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पाय घसरुन पडली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर तिघी पाण्यात उतरल्या. चौघी पाण्यात बुडाल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर जवानांनी चौघींना बाहेर काढले. बेशुद्धवस्थेतील मुस्कान हिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषीत केले.

ठेकेदाराने रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.