PMC Action On Unauthorized Hotel-Bar-Pubs In Pune हॉटेल, बार चालकांना पालिकेचा दणका ! शहरातील 30 हून अधिक हॉटेल्स, बारचे 30 हजार चौ.फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

Unauthorized Hotel-Bar-Pubs

पुणे : PMC Action On Unauthorized Hotel-Bar-Pubs In Pune | फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्य विक्रीसह पार्टीमध्ये अंमली पदार्थाचे सेवन होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्यकर्ते आणि प्रशासन पुन्हा ऍक्शन मोडवर आले आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहराच्या विविध भागातील तीस हून अधिक हॉटेल्स आणि बारच्या फ्रंट आणि साईडमधील अतिक्रमण पाडत तीस हजारांहून अधिक क्षेत्र रिकामे केले.

   प्रामुख्याने फर्ग्युसन रस्ता परिसर आणि बाणेर बालेवाडी हायस्ट्रीट येथील हॉटेल्सवर मोठ्याप्रमाणावर कारवाई करण्यात आली असून बिबवेवाडी परिसरातील हॉटेल्सची अतिक्रमणही पाडण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. बालेवाडी हायस्ट्रीटवरील अर्बन फाउंड्री, एटुलिया बेरुस्टो, नबाब एशिया, हिप्पी ऍन्ड हार्ट, द इंडिपेन्डट डे, बटर ऍन्ड बार, हॉटेल फोर्ट मार्जीन सह सात हॉटेल्सच्या फ्रंट आणि साईड मार्जीन मधील बांधकामांवर कारवाई करुन सुमारे साडेअकरा हजार चौ.फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले.

 फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली, शिरोळे मॉल, कल्चर हॉटेल आणि येथील कॅफेसह साधारण पंधरा आस्थापनांच्या फ्रंट आणि साईड मार्जीनमधील बांधकामे आणि शेडस् पाडण्यात आली. या कारवाईत सुमारे दहा हजारांहून अधिक चौ.फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

 महिन्याभरापुर्वी कल्याणीनगर येथील पब बाहेर बांधकाम व्यायवसायीकाच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्शे या पॉश मोटारीच्या धडकेने एका तरुणीसह दोघांचा बळी घेतला. या घटनेनंतर शहरातील सर्रास नियमांचे उल्लंघन करून चालविले जाणारे पब, रेस्टॉरंट आणि हॉटेल्स रडारवर आली. विरोधकांनी या ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवनही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे आरोप आणि आंदोलने केल्याने सत्ताधारी देखिल ताळ्यावर आले. मागील महिन्याभरात शहरातील सुमारे १४४ पब, रुफटॉप हॉटेल्स, बारवर कारवाई केली. पोलिस, महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानेही नियमांचे उल्लंन करणार्‍यांवर कारवाईचा धडाका लावला. अनेक पब आणि बारचे परवाने निलंबित केले. परंतू यानंतरही फर्ग्युसन रस्त्यावरील एका पबमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्टीमध्ये मद्याासोबतच अंमली पदार्थांचे सेवन झाल्याचा  प्रकार उघडकीस आल्यानंतर शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी देखिल याची गंभीर दखल घेतली.  या पार्टीप्रकरणी आठहून अधिक  जणांना अटक करण्यात आली असून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

महापालिकेने काही महिन्यात शहरातील १४४ हून अधिक बेकायदा रुफ टॉप हॉटेल्स, पब्ज, रेस्टॉरंट आणि बारच्या फ्रंट आणि साईड मार्जीनमध्ये केलेल्या अनधिकृत शेडस् आणि बांधकामांवर कारवाई करून सुमारे तीन लाख चौ. फूट क्षेत्र मोकळे केले आहे. कारवाईनंतरही पुन्हा अतिक्रमण करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी ९१ प्रकरणे पोलिसांकडे सोपविली आहेत. आतापर्यंत २६ व्यावसायीकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस बंदोबस्त उपलब्ध होईल, त्यानुसार अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे.

  • डॉ. राजेंद्र भोसले, पुणे महापालिका आयुक्त
  • (Dr Rajendra Bhosale)