Murlidhar Mohol | मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यांनतर मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले – ‘आज 30 वर्षांनंतर…’

0

पुणे: Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदार संघातून (Pune Lok Sabha) पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान मिळाले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आज शपथ घेणार आहेत. मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून सकाळी फोन आला. त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होत आहे.

मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळाले. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला होता. नगरसेवक, महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, ” “कार्यकर्ता म्हणून मला आनंद वाटतो आहे. गेल्या ३० वर्षांपासून मी संघटनेत काम केलं आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मला पुण्यातील जनतेने अनेकदा दिली आहे. आज मला नवीन जबाबदारी मिळत आहे. त्याचा आनंद आणि समाधान आहे. मात्र, दुसरीकडे या जबाबदारीची जाणीव मला आहे. हा प्रत्येक पुणेकरांसाठी सन्मान आहे. आज ३० वर्षांनंतर पुण्याला केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व मिळते आहे”, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले , “मला मंत्रीमंडळात स्थान मिळेल हे अनपेक्षित होतं. मात्र, पक्षाने मला ही संधी दिली आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस यांनी मला संधी दिली आहे. या सगळ्यांचा मी आभारी आहे. विशेषतः मी पुणेकराचे धन्यवाद देतो, की त्यांनी मला निवडून दिले. मला काम करायची संधी दिली”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.