Shrikant Eknath Shinde | “… म्हणून केंद्रीय मंत्रिपद नाकारलं”, श्रीकांत शिंदेनी सांगितलं कारण

0

मुंबई: Shrikant Eknath Shinde | नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. दिल्लीत हा शपथविधी होत आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणकोण असणार याची चर्चा होती. नुकतंच श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेचे लोकसभेतील गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. आता या तरुण खासदाराला मंत्रिपद द्यावं अशी विनंती शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

शिवसेनेच्या सर्व खासदारांची दिल्लीत बैठक झाली. यावेळी या बैठकीत खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे श्रीकांत शिंदे यांच्या मंत्रिपदासाठी आग्रह धरला होता. मात्र अखेर मंत्रीपदाची माळ प्रतापराव जाधव यांच्या गळ्यात पडली. याबाबत श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांना बोलताना माहिती दिली आहे.

ते म्हणाले , “याआधी अनेक उदाहरणं आपण पाहिली. काही पक्षांमध्ये त्यांनी स्वतःचा मुलगा पॅराशूट लँडिंग करून आमदार करून घेतला. दोन विद्यमान आमदारांना घरी बसवलं. पुन्हा त्यांना आमदार केलं. त्यानंतर मुलाला मंत्रीपद दिलं. जिथे कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यायचं होतं, तिथे तीन तीन जणांना एकाच विधानसभेत तुम्हाला आमदारकी द्यावी लागली. मी तर तिसऱ्यांदा खासदार झालो आहे. मंत्रीही झालो असतो. पण मंत्रीपदापेक्षा पक्षाला माझी जास्त गरज आहे असं मला वाटतं. शिंदेंनी पुत्रमोह बाजूला ठेवला. त्यांच्या पुत्रानंही पक्षासाठी तो निर्णय मान्य केला”, अशा शब्दांत श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

ते पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी नेहमीच कार्यकर्त्याला प्राधान्य दिलं. आजही तेच उदाहरण महाराष्ट्रानं पाहिलं. मी तिसऱ्यांदा खासदार झालो. सध्याच्या परिस्थितीतही मोठ्या मताधिक्यानं निवडून आलो. सगळ्यांची इच्छा होती की मी केंद्रात मंत्री व्हायला हवं. पण आत्ता पक्षाला सगळ्यात जास्त गरज पक्षबांधणीची आहे.

फक्त दोन वर्षांत लोकांना वाटत नव्हतं की शिवसेनेचे २ खासदारही निवडून येतील. पण आज सर्वात चांगला स्ट्राईक रेट शिवसेनेचा आहे. ७ खासदार निवडून आले. ४ खासदार आणखी निवडून आले असते. शेवटच्या क्षणी त्यांचं नाव जाहीर करणं, बदल करणं या गोष्टी केल्या नसत्या तर आम्ही २ अंकी संख्या गाठली असती. पण या चुका झाल्या. त्याचं विवेचन होऊन आम्ही त्यावर मार्ग काढू.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आपल्याला मंत्रीपद न दिल्यामुळे महाराष्ट्रात योग्य संदेश गेला आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. “आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. माझ्यापेक्षा जेष्ठ सदस्य पक्षात आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी संधी दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्रात योग्य तो संदेश गेला आहे” असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.