Murlidhar Mohol | पुण्याच्या लोकनियुक्त खासदाराला तब्बल 28 वर्षांनी केंद्रात मंत्रिपद

0

पुणे:| लोकसभा निवडणूका झाल्यानंतर नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात भाजपची धुळधाण होत असताना मुरलीधर मोहोळ आणि उदयनराजे यांनी भाजपच्या दोन जागा राखल्या. यात उदयनराजेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.

मात्र कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत झालेला पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर. पुणे शहर आणि जिल्ह्यावर लक्ष देण्याची रणनीती असल्यामुळेच भाजपनं मुरलीधर मोहोळांना संधी दिल्याची चर्चा आहे.

पुणे शहरातून यापूर्वी काँग्रेसचे काकासाहेब गाडगीळ, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, मोहन धारिया, सुरेश कलमाडी यांनी केंद्रीय मंत्रिपद भूषवले आहे. पुण्याचं मैदान मारल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये मुरलीधर मोहोळ यांना थेट मंत्रिपदाची लॉटरी लागलीय. सुरेश कलमाडी यांच्यानंतर तब्बल २८ वर्षांनी पुणे शहराला मोहोळ यांच्या रुपाने मंत्रिपद मिळालं आहे.

राज्यात पुणे लोकसभा ही सर्वात लक्षवेधी लढत ठरली. विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर विरुद्ध माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात झालेल्या या लढतीत मोहोळ यांनी तब्बल १ लाख २३ हजार मतांनी धंगेकरांचा पराभव केला. अत्यंत प्रतिष्ठेचं असलेल्या पुण्याचं मैदान मारल्यामुळे पहिल्यांदाच निवडून आल्यानंतरही मोहोळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.