Jayant Patil On BJP | “… भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला ” जयंत पाटील यांचा भाजपावर निशाणा

0

पुणे: Jayant Patil On BJP | शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. शिवाजी नगर, जेएम रस्ता, हडपसर, सिंहगड रोड परिसर, वारजे या सर्व भागात जोरदार पाऊस झाला. रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले. (Pune Rains)

वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. पुणे महानगरपालिकेने केलेल्या नालेसफाईवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

दरम्यान पुण्यातील पावसामुळे झालेल्या परिस्थितीवर जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला!” असे म्हणत त्यांनी भाजपला खोचक टोलाही दिला आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “काल पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याची दृश्ये मी पाहिली. रस्त्यांवरून अक्षरशः नद्या वाहत होत्या. संपूर्ण चौकच्या चौक पाण्यात बडून गेले होते. अनेक चार चाकी गाड्या देखील पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. अवघ्या दोन तासांच्या पावसात पुणे शहराची ही अवस्था झालेली आहे.

पुणे महानगरपालिकेमध्ये सलग पाच वर्ष सत्तेत राहून तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी काय विकास केला हे आज सिद्ध झाले. पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला!” असे जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.