Sassoon Hospital | धक्कादायक ! ‘ससून’मध्ये दररोज 24 रुग्णांचा मृत्यू! 2023 मध्ये 8 हजार 875 जण रुग्णालयात दगावले

0

पुणे: Sassoon Hospital | ससून रुग्णालयात दिवसाला २४ रुग्णांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेकदा खासगी रुग्णालयात दाखल असलेला रुग्ण अत्यवस्थ झाला की त्याला ससून रुग्णालयात दाखल केले जाते. त्यामुळे मृत्यू ‘ससून’ मध्ये झाला, अशी नोंद केली जाते, असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष घोलप (Santosh Gholap RTI) यांनी याबाबत माहिती मागवली आहे. राज्यात सरकारी रुग्णालयात गेल्या वर्षी झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी माहिती अधिकारात मागवली आहे.

त्यामध्ये २०२३ मध्ये सर्व सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी देण्यात आली आहे. त्यात राज्यात सर्वाधिक ८ हजार ८७५ मृत्यू ससून रुग्णालयात झाल्याची नोंद आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याबाबत चौकशी करण्याची मागणी घोलप यांनी केली आहे. रुग्णालयात वर्षभरात किती मृत्यू झाले यापेक्षा नेमका मृत्युदर किती आहे हे पाहायला हवे अशी प्रतिक्रिया डॉ. दिलीप म्हैसेकर , संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालय यांनी दिली आहे.

गेल्या काही वर्षांत शहराची आणि जिल्ह्याची लोकसंख्या वाढली. मात्र, त्या तुलनेत सरकारी रुग्णालयांची संख्या वाढली नाही. परिणामी, वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत ससून सर्वोपचार रुग्णालयातील सुविधा आणि मनुष्यबळ अपुरे पडत असल्याची स्थिती आहे.

रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल होत असल्याने सर्वच विभागात उपचार घेण्यासाठी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. रुग्णालयात पुणे शहर, जिल्ह्यासह सांगली, सातारा, सोलापूर, नगर आणि राज्यभरातून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रुग्णालयावरचा ताण प्रचंड वाढल्याचे संबंधित विभागाकडून नेहमी सांगण्यात येत असते.

Leave A Reply

Your email address will not be published.