Sangli Tasgaon Accident | वाढदिवस ठरला अखेरचाच; कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

0

सांगली: Sangli Tasgaon Accident | तासगाव मणेराजुरी महामार्गावर चिंचणी हद्दीत चालकाचा ताबा सुटून एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातातील एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या अपघातात गाडीतील राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय ५६), त्यांच्या पत्नी सुजाता जगन्नाथ पाटील (वय ५२), रा. तासगाव, मुलगी प्रियंका अवधूत खराडे (वय ३३), नात दुर्वा अवधूत खराडे (वय ५), दुसरी नात कार्तिकी अवधूत खराडे (वय १), सर्व रा. बुधगाव आणि राजवी विकास भोसले (वय २) रा. कोकळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाटील यांची दुसरी मुलगी स्वप्नाली विकास भोसले ही गंभीर जखमी असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे कुटुंबीय समवेत कोकळे (ता – कवठेमहांकाळ) येथे नातीच्या वाढदिवसानिमित्त गेले होते. वाढदिवस संपल्यानंतर ते आपल्या कुटुंबियांसमवेत तासगावला येत होते.

तासगाव जवळ आल्यांनतर तासगाव ते मणेराजुरी महामार्गावर असलेल्या ताकारी योजनेच्या कालव्याजवळ चालक राजेंद्र पाटील यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट कालव्यात कोसळली. हा अपघात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला होता.

सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तासगाव पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी स्वप्नाली भोसले यांना रुग्णालयात नेले. या अपघातामुळे राजवीचा दुसरा वाढदिवस शेवटचा वाढदिवस ठरला आहे. या घटनेने तासगाव शहरात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.