Pune Police Commissioner Amitesh Kumar | पुणे पोलीस डॉक्टरांच्या पाठीशी, रुग्णालयासह डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई करणार- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

0

पुणे : – Pune Police Commissioner Amitesh Kumar | उपचारादरम्यान एखादा रुग्ण दगावला तर त्याच्या नातेवाईकांकडून, समाजसेवक यांच्याकडून रुग्णालय प्रशासन अथवा डॉक्टरांना वेठीस धरले जाते. पेशंटचे पूर्ण बिल माफ करण्यासाठी किंवा बिल कमी करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जातात. यापुढे अशाप्रकारे रुग्णालय किंवा डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

मागील आठवड्यात एका रुग्णालयात पेशंट उपचारादरम्यान दगावला. त्यानंतर पेशंटच्या नातेवाईक व समाजसेवकांनी रुग्णालयात गर्दी करुन पेशंट दगावलाच कसा, संपूर्ण बील माफ करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. अशा प्रकारच्या घटना पुणे शहरात अनेकदा होत असतात. त्यामुळे पुणे पोलिसांनी रुग्णालयासह डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे मत डॉक्टर संघटनेने व्यक्त केले होते.

यावर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये रुग्णालय तसेच डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा, कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज नाही, असे आदेश पोलीस उपायुक्तांसह सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.

तसेच रुग्णालय किंवा डॉक्टरांविषयी तक्रार असेल तर त्यासाठी आयएमए सारख्या संस्थांकडे तक्रार करता येते, त्यात जर रुग्णालय प्रशासन अथवा डॉक्टर दोषी असतील तर कारवाई केली जाते. त्यामुळे नागरिकांनी अशाप्रकारे रुग्णालय प्रशासनाला वेठीस धरणे चुकीचे असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.