Maharashtra Govt On Waqf Board Funds | वक्फ बोर्डाला दिलेल्या 10 कोटींच्या निधीवर सरकारचे स्पष्टीकरण, म्हणाले – “केंद्र शासनाच्या वक्फ… “
मुंबई : Maharashtra Govt On Waqf Board Funds | राज्य सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी देण्याच्या निर्णयावर टीका होत आहे. मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढी वाल्याला मदत करणे योग्य नाही. सरकारने वक्फ बोर्डाची बळकटी करण्यासाठी हा निर्णय घेतला. पण मग हे सरकार हिंदूंची बळकटी करणार का? असे प्रश्न मनसेने उपस्थित केले आहेत.
विश्व हिंदू परिषदेकडूनही सरकारच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. “राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून हिंदुत्वचा वारसा घेऊन चालणारे सरकार जर अशी कारवाई करणार असेल, तर त्यांना हिंदुत्वाचे वारसदार म्हणावं की नाही म्हणावं असा प्रश्न जनतेसमोर निर्माण होत आहे,” असे विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र-गोवा प्रांत महामंत्री गोविंद शेंडे यांनी म्हटलं आहे.
वक्फ बोर्डाला दिलेला निधी हा बोर्डाच्या बळकटीकरणासाठी असल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे. “केंद्र शासनाच्या वक्फ विषयक संयुक्त संसदीय समितीने २००७ साली राज्यात भेट दिली होती. त्यावेळी तत्कालीन राज्य शासनाने वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याचे आश्वासन दिलं होतं.
त्यानुसार तत्कालीन राज्य शासनाने या मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याची योजना २०११ पासून सुरु केली. त्या योजनेनुसार अल्पसंख्याक विकास विभागाद्वारे वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात मागणीप्रमाणे निधी दिला जातो. त्यानुसार हा निधी दिला आहे,” असे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिलं आहे.