Kalyani Nagar Pune Accident | पुणे हिट अँड रन प्रकरण : वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच..! अश्विनीच्या आईच्या आक्रोशाने सर्वांचे डोळे पाणावले

0

पुणे : अश्विनी शनिवारी रात्री माझ्याशी बोलली होती. तिने 18 जूनला जबलपूरला येण्याचे तिकीट काढले. वडिलांचा वाढदिवस असल्याने तिला त्यांना सरप्राईज द्यायचे होते. ते आता सरप्राईजच राहिले… देवाने तिला आमच्यापासून हिरावून नेले, असे सांगत कल्याणी नगर येथील अपघातात मृत्यू झालेल्या अश्विनी कोस्टाच्या (Ashwini Costa) आईने हंबरडा फोडला. कुणाच्या तरी चुकीची शिक्षा माझ्या निष्पाप मुलीला का? असा सवालही अश्विनीच्या आईने केला. रुग्णवाहिकेतून अश्विनीचे पार्थिव ससून रुग्णालयाच्या शवागारात आल्यावर त्यांचा आक्रोश पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले. (Pune Hit And Run Case)

कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात कारच्या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या संगणक अभियंत्यांचा मृत्यू झाला. अश्विनी ही मूळची मध्य प्रदेशातील जबलपूर येथील आहे. पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली होती. अनिश अवधियाने डी. वाय. पाटील कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. दोघेही जॉन्सन कंट्रोल या कंपनी काम करत होते. त्यातून त्यांची मैत्री झाली होती. अनिश विमान नगर या ठिकाणी एका घरात भाडे तत्वावर राहात होता. त्याला फारसे मित्र नव्हते. तो त्याच्या लहान भावासह त्या घरात राहात होता.

अनिस याचा चुलत भाऊ पारस सोनी म्हणाला, आम्हाला पहाटे फोन आला आणि धक्काच बसला. अनिशचे आई-वडील वृद्ध आहेत. त्यांची काळजी घेणारे कोणी नाही. त्यामुळे त्यांना अगोदर अपघाताची माहिती दिली नव्हती.

अनिश शिक्षणात टॉपर होता. त्याला पुढील शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेला जायचं होतं ते त्याचं स्वप्न होतं. आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा कोडिंगविषयी चर्चा करायचो. एक मित्र म्हणूनही अनिश खूप चांगला माणूस होता. आमचे व्यापारी कुटुंब आहे. अनिशच्या वडिलांचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. आमच्या कुटुंबातील अनिस हा पहिला आयटी इंजिनिअर होता.

Leave A Reply

Your email address will not be published.