Supriya Sule On Sassoon Hospital | “ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके… ” सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी

0

पुणे: Supriya Sule On Sassoon Hospital | कल्याणीनगर अपघात प्रकरणातील (Kalyani Nagar Accident) अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी रक्त तपासणीच्या अहवालात फेरफार केल्याचा आरोप आहे. त्याबाबत पोलिसांनी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) आणि डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) या दोघा डॉक्टरांना अटक केली आहे.

डॉक्टरांवरील आरोपांबाबत आता समिती नेमण्यात आली आहे. मात्र ही समिती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या समितीतील डॉक्टरांवरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे ‘उंदराला मांजर साक्ष’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ससून रुग्णालयाच्या एकूण कारभारावर प्रश्न उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे मागणी केली आहे.

सुप्रिया सुळेंनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “पुणे जिल्हा आणि परिसरातील गोरगरीब रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात ससून रुग्णालयाने सिंहाचा वाटा उचलला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून या रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. काही दिवसांपूर्वी ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी हे रुग्णालय चर्चेच्या केंद्रस्थानी होते.

तर आता कल्याणीनगर ‘हिट ॲन्ड रन’ प्रकरणी (Pune Hit And Run Case) आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे प्रकरण चर्चेत आहे. याप्रकरणी दोन वरीष्ठ डॉक्टरांना अटक देखील करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे ससूनची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज असून दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हायला हवे. असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या ,” वास्तविक पाहता ससून रुग्णालय हे उत्कृष्ट रुग्णसेवेसाठी ओळखले जाते. कोरोना काळात देखील येथे उत्तम सेवा उपलब्ध झाली होती. ससूनमध्ये तज्ज्ञ, अभ्यासू आणि अनुभवी डॉक्टर्स आहेत. त्यांच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे उपचार गरजू व गरीब रुग्णांना मिळतात. याखेरीज परिचारिका व सपोर्टींग स्टाफचे देखील सहकार्य लाभते. शिवाय अनेक नामांकित डॉक्टर येथून शिकून गेले आहेत. परंतु गेल्या काही दिवसांच्या घटनाक्रमानंतर आणि डॉक्टरांच्या अटकेनंतर त्यांच्यावर देखील शंका घेतली जात आहे.

काही लोकांनी गैरकृत्य केले असेल तर त्यामुळे इतरांकडेही संशयाने पाहिले जाणे योग्य नाही. तसेच रुग्णसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणारी शासकीय संस्था अशाप्रकारे संशयाच्या भोवऱ्यात अडकणे हे चांगले लक्षण नाही. म्हणूनच रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर कामकाजाची समिक्षा होणे आवश्यक आहे. माझी शासनाकडे मागणी आहे की, आपण ससूनच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढून ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके काढून टाकण्यासाठी उपाययोजना करावी.” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी शासनाकडे ट्विट च्या माध्यमातून केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.