Ajit Pawar Not Reachable | अजित पवार पुन्हा नाराज, पुन्हा नॉट रिचेबल, राष्ट्रवादी काँग्रेसने दिले स्पष्टीकरण, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याचा घेतला समाचार

0

मुंबई : Ajit Pawar Not Reachable | काल नाशिक (Nashik Lok Sabha), कल्याण (Kalyan Lok Sabha) आणि मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा (PM Narendra Modi Sabha) आणि रोड शो (PM Narendra Modi Road Show) असे प्रचार कार्यक्रम झाले. यावेळी सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. अजित पवार मात्र कुठेही दिसले नाहीत. यावरून अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे, तर अजित पवार नॉट रिचेबल असल्याचेही बोलले जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी सांगितले की, अजित पवार यांना घशाचे इन्फेक्शन झाले असून ते उद्यापासून पुन्हा प्रचारात दिसतील. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

उमेश पाटील यांनी सांगितले की, अजित पवार नॉटरिचेबल असले की ते नाराज आहेत, अशा बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात. पण ते नॉटरिचेबलही नाहीत आणि नाराजही नाहीत. अजित पवार यांना निवडणुकीच्या काळात घशाचे इन्फेक्शन झाले होते, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितली आहे. ते उद्यापासून पुन्हा प्रचारात सहभागी होतील.

अजित पवार यांना जाणीवपूर्वक प्रचारापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. याबाबत उमेश पाटील म्हणाले, काँग्रेसचे आरोप खोटे आहेत. अजित पवार यांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये, वॉर्डात, तालुका, जिल्ह्यात आहेत. मतदारांचा मोठा वर्ग त्यांच्या पाठिशी आहे. पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजुला ठेवून कोण स्वतः चे नुकसान करुन घेईल का? असा सवाल पाटील यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटले होते, याबाबत उमेश पाटील म्हणाले, अजित पवार यांच्या पक्षाला जागा मिळणार की नाही, हे मतदार ठरवतील.

४ जूनला त्याचा निकाल येईल. अजित पवार यांच्या पाठीशी ४०-५० आमदार आहेत. पण पृथ्वीराज चव्हाणांबरोबर एकही आमदार नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे भाष्य माध्यमांनी किती गांभीर्याने घ्यावे याचादेखील विचार करावा, असा टोला पाटील यांनी लगावला.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना उमेश पाटील म्हणाले, राज्यात निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे असे दावे करून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पृथ्वीराज चव्हाण फक्त राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांना टीव्हीवर टीआरपी मिळतो.

पण त्यांना राज्यासंदर्भात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राजकारणावर भाष्य करावे, एवढी त्यांची उंची नाही. विधानसभेत ते नेतृत्व करतात पण त्यांना त्यांची स्वतःची ग्रामपंचायत देखील स्वताकडे ठेवता आलेली नाही हे केवढे मोठे दुर्दैव आहे, असे पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.