Professor G N Saibaba | कारागृहात माझा अनन्वित छळ, ९० टक्के शरीर कार्यरत नसताना अतोनात त्रास दिला, प्रा. साईबाबांचा गंभीर आरोप

0

नागपूर : Professor G N Saibaba | कधीही न केलेल्या गुन्ह्यासाठी मी १० वर्षांपासून कारागृहात नरकयातना भोगत आहे. माझे १० टक्के शरीर काम करते आणि ९० टक्के शरीर कार्यरत नाही. एवढे असूनही कारागृहात माझ्यावर अतोनात अन्याय केला. अंडासेलमध्ये शौचास, लघुशंकेलाही जाता येत नव्हते, अशा स्थितीत मला ठेवून त्रास दिला. मला कोणतीही वैद्यकीय सेवा किंवा औषधोपचार दिले नाहीत. मी कसा जिवंत बाहेर आलो हेच नवल आहे, असे गंभीर आरोप प्रा. जी.एन. साईबाबा यांनी पत्रकार परिषदेत केले.

उच्च न्यायालयाने प्रा. जी. एन. साईबाबा यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची नक्षलसमर्थक आणि देशविरोधी कारवायाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर बुधवारी सकाळी प्रा. साईबाबा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले. त्यावेळी त्यांची पत्नी, भाऊ आणि वकील उपस्थित होते. यानंतर प्रा. साईबाबा यांनी दुपारी अ‍ॅड. निहालसिंह राठोड यांच्या कार्यालयात पत्रकारपरिषद घेतली.

प्रा. जी. एन. साईबाबा यांनी त्यांच्यावरील कारवाईची माहिती देताना सांगितले की, प्रा. सुरेंद्र मोहन, प्रा. रणधीर सिंह,
सनदी अधिकारी बी.डी. शर्मा, स्वामी अन्वेश, न्यायमूर्ती सचाळ यांच्यासह काही विचारवंतांनी नक्षलग्रस्त भागातील
आदिवासी, दलित आणि अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडून मानवाधिकाराच्या माध्यमातून
न्याय मिळवून देण्यासाठी काही कागदपत्रे गोळा करण्याची जबाबदारी दिली होती.

प्रा. साईबाबा म्हणाले, सरकार आणि पोलिसांचा नागरिकांवरील अन्याय समोर येऊ नये म्हणून मला ग्रीन हंट
आणि ऑपरेशन सलवा झुडूम या अंतर्गत फसवले.
माझ्याकडील कागदपत्रे जप्त करून थेट नक्षलसमर्थक असल्याचा आरोप केला. मला तब्बल १० वर्षे कारागृहात डांबले.

प्रा. साईबाबा म्हणाले, मी दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होतो. शिक्षण, विद्यार्थी, ग्रंथालय हेच माझे घर होते.
या १० वर्षात मला माझ्या शिक्षणापासून, विद्यार्थ्यांपासून आणि कुटुंबापासून दुर ठेवण्यात आले.
ही माझ्या जीवनातील न भरून निघणारी हानी आहे.

प्रा. साईबाबा म्हणाले, कोणताही पुरावा किंवा तथ्य नसतानाही मला अटक केली. खोट्या आरोपात गोवले. जीवनातील १० वर्षे माझ्यासारख्या अपंग व्यक्तीवर अन्याय केला. मला न्यायालयावर विश्वास आहे, मानवाधिकारावर विश्वास होता त्यामुळे अखेर सत्य समोर आले.

मात्र, माझ्यावर ओढवलेले प्रसंग खूप मोठ्या जखमा देऊन गेले. मी कुटुंबापासून दूर राहिलो आणि शैक्षणिक नुकसान झाले. माझे वकील सुबोध धर्माधिकारी यांनी मेहनत करून सत्य न्यायालयासमोर आणले, असे प्रा. साईबाबा म्हणाले.

Sunil Tatkare-BJP | मतदारसंघातच सुनिल तटकरेंविरोधात भाजपा पदाधिकाऱ्याचे आवाहन, ”रायगड भ्रष्टाचाराच्या खाईत जाईल, मतदान करू नका”

Leave A Reply

Your email address will not be published.