Pune Crime News | कानून के हात लंबे होते है ! फरार झालेल्या खुनातील आरोपीला 13 वर्षानंतर राजस्थानमधून अटक; चतु:श्रृंगी पोलिसांची कारवाई

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आणि न्यायालयाने फरार घोषीत केलेल्या आरोपीला चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील (Chaturshringi Police Station) तपास पथकाने राजस्थान येथून अटक केली आहे. खून केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. अखेर 13 वर्षांनी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना 15 मार्च 2011 रोजी रात्री अकरा वाजता सेनापती बापट रोडवरील अंबिका सोसायटीत घडली होती. बिट्टी उर्फ शामबाबु छोटेलाल यादव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

बाबुराव विठ्ठल मोघेकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते सुपरवायझरचे काम करत होते. तर आरोपी राजा उर्फ रज्जवा रामकेश यादव व बिट्टी उर्फ शामबाबु छोटेलाल यादव हे अंबिका सोसायटीच्या बांधकाम साईटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. 15 मार्च 2011 रोजी मयत बाबुराव मोघेकर हे आरोपींनी चेक देण्यासाठी बांधकाम साईटवर गेले होते. त्यावेळी त्यांच्या वादावादी होऊन आरोपींनी मोघेकर यांना लिफ्टमध्ये तोंडात कापडी बोळा कोंबून व त्यांचे दोन्ही हात रस्तीने बांधून खून केला होता. त्यानंतर आरोपी शामबाबु फरार झाला होता.

पोलीस ठाण्यातील तपास पथक आणि गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेत होते. पोलिसांच्या पथकांनी आरोपीच्या मुळ गावी पहाडी, जि. चित्रकुट उत्तर प्रदेश येथे जाऊन वारंवार शोध घेतला मात्र तो सापडत नव्हता. त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालय, पुणे यांनी आरोपीला फरार घोषित केले होते.

आरोपी शामबाबु हा त्याचे अस्तित्व लपवून नाव बदलून वेगवेगळ्या राज्यात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता तो राजस्थान मधील झालावाडा जिल्ह्यात नाव बदलून राहत असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने त्याठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला. त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपी राजस्थानमध्ये राध्येशाम या नावाने राहात होता. त्याला झालावाड न्यायालयात हजर करुन ट्रान्झीट रिमांड प्राप्त करुन पुण्यात आणण्यात आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण, पोलीस उपनिरीक्षक अंगत नेमाने, पोलीस हवालदार सचिन कांबळे, सुहास पोतदार, सुधाकर माने, अस्लम अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल गोकुळ घुले यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.