Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात जल्लोषात श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा (Videos)

ट्रस्टकडून प्रमुख सहा मंदिरांना मानाचे ताट

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरा’त श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा (Ram Pran Pratishtha) जल्लोषात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. रामरक्षा स्तोत्र पठण, रामनाम जप, महाआरती यासोबतच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून शहरातील सहा प्रमुख राम मंदिरात मानाचे ताट देण्यात आले.

अयोध्येत श्री प्रभुरामाची प्रतिष्ठापना झाली. यानिमित्ताने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्यावतीनेही रविवार ते मंगळवार या तीन दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून मंदिरात रामरक्षा स्तोत्र पठण व रामनाम जप करण्यात आला, तसेच सकाळी साडेआठची आरती कारसेवक संजय गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना होताच मंदिरासमोर श्री समर्थ पथकाने वादन करत ढोल ताशाचा गजर केला. यावेळी अवघा परिसर दुमदुमून गेला होता.

याचबरोबर ‘ट्रस्ट’कडून तुळशीबाग राम मंदिर, रहाळकर राम मंदिर, पुणे विद्यार्थी गृह, काटे राम मंदिर, जोशी राम मंदिर आणि काळाराम मंदिर यांना मानाचे ताट देण्यात आले. सायंकाळी मंदिरात दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळी भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर, विवेक मटकरी, प्रशांत यादव आणि अ‍ॅड. शरद चंद्रचूड यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. ट्रस्टच्यावतीने अयोध्या रामजन्मभूमी सोहळा लाईव्ह पाहण्याची सोयही करण्यात आली होती.

‘‘अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना होणं ही देशभरातील कोट्यवधी भाविकांसोबतच आपल्या सर्वांसाठीच आनंदाची गोष्ट आहे. हाच आनंद द्विगुणित व्हावा आणि शहरातील श्रीरामाच्या काही प्रमुख मंदिरांना मानाचे ताट देता यावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’मार्फत हा कार्यक्रम घेता आला याचे समाधान आहे.’’

– पुनीत बालन Punit Balan
(विश्वस्त व उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

Leave A Reply

Your email address will not be published.