Jogendra Katyare Suspended | खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे अखेर निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधातील पत्रप्रपंच नडला

0

पुणे : Jogendra Katyare Suspended | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase) यांच्या विरोधात थेट मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून कार्यालयीन शिस्तीचा भंग करून राज्य सरकारची प्रतिमा मलीन केली असा ठपका ठेवत खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांना राज्यसरकारने निलंबित केले आहे. निलंबनाच्या काळात त्यांची विभागीय चौकशी होणार असून त्याचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय (Pune Collector Office) असेल.

ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांनी थेट निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

वरिष्ठांच्या विरोधात तक्रार करताना विहित मार्गाचा अवलंब न केल्याने कट्यारे यांची ही कृती राज्यशासनाने नियमबाह्य ठरवत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटिसीला सात दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले होते. अखेर राज्यसरकारने कट्यारे यांना निलंबित केले आहे. राज्य सरकारचे अतिरिक्त सचिव संजीव राणे यांनी राज्यपालांच्या नावे हा आदेश जारी केला आहे.

कट्यारे यांनी निवडणुकीच्या काळात प्रशासकीय कामकाज आणि निवडणूक आचारसंहिता यांची गल्लत करून कार्यालयीन शिस्तीचे पालन न करता थेट निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून बिनबुडाचा आरोप केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या प्रकारामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिले) नियम १९७९ मधील नियम ८ नुसार विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून, या काळात त्यांना निलंबित करण्याचेही आदेश काढण्यात आले आहेत. निलंबनाच्या काळात त्यांना मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय असेल.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही आदेशात म्हटले आहे. या काळात त्यांना कोणतीही खासगी नोकरी करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.दिवसे यांच्या राजकीय संबंधांवरून कट्यारे यांनी त्यांची मतमोजणीपूर्वी बदली करावी, अशी मागणी केली होती. दिवसे हे आपल्याला मानसिकदृष्ट्या छळत असल्याचाही आरोप कट्यारे यांनी त्यात केला होता.

या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना चौकशी करून अहवाल पाठविण्यास सांगितले होते. पुलकुंडवार यांनी दिलेल्या अहवालानंतर राज्य सरकारने कट्यारे यांना नोटीस बजावली होती.

नेमके आरोप काय होते?

खेड आळंदीचे प्रांताधिकारी (Khed Prantadhikari) आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदार यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रिडा आयुक्त, पीएमआरडीए चे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंधाचा आधार घेतला असल्याचा आरोप जोगेंद्र कट्यारे यांनी केला.

दिवसे हे जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देत आहेत. आमदार त्यांचे हितसंबध जोपसण्यासाठी दिवसे यांचा वापर करत आहे, असे कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हंटले. सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमिन अधिग्रहण प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केलेली असताना २८ मे रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा घातला.‌

दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केले असल्याचे त्यांनी म्हंटले. सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असून मतमोजणी आधी त्यांची बदली करावी अशी खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.