Rohit Pawar On Ajit Pawar | ‘भाजप नेहमीच लोकनेत्याला संपवतं, दादांबाबतीत तेच होणार’; रोहित पवारांचे वक्तव्य

0

मुंबई : Rohit Pawar On Ajit Pawar | आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सुरु झालेली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यापासून या ना त्या पद्धतीने अजित पवारांवर महायुतीतीलच मित्रपक्षांच्या नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळवले. तर दुसरीकडे महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, संघाचे मुखपत्र , भाजप कार्यकर्त्यांमधील असंतोष या माध्यमातूनही महायुतीत (Mahayuti) अजित पवारांच्या सहभागाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान भाजप, शिंदे गट यांच्याकडूनही अजित पवारांवर सातत्याने खोचक टीका केली जात आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीवर आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. माध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार भाजपसोबत राहिले, तर त्यांना २० ते २२ जागा दिल्या जातील असे रोहित पवार म्हणाले आहेत.

लोकसभेत महायुतीला म्हणावं तसं यश मिळालं नाही, तेव्हापासून या ना त्या कारणाने अजित पवारांच्या सरकारमधील सहभागाचा मुद्दा ऐरणीवर येतोय. आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्राने अजितदादांवर पराभवाचं खापर फोडलं. शिंदे गटाच्या रामदास कदमांनीही दादांवर तिरकस टिप्पणी केली. आणि आता तर भाजपच्या एका कार्यकर्त्यानं एकवेळ सत्ता नसली तरी चालेल, पण अजितदादांना सत्तेतून हाकला, असा पवित्रा घेतला गेला आहे असे रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार पुढे म्हणाले, ” अजित पवारांना विरोध होताना पाहायला मिळतंय, पुण्यानंतर इंदापूरमध्ये एका कार्यकर्त्यानं थेट अजित पवारांचं नाव घेऊन विरोध दर्शवला. त्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “सुरुवातीपासून आम्ही हेच सांगतोय की, भाजप नेहमीच लोकनेत्याला संपवतं आणि अजित पवारांच्या बाबतीत तेच होणार आहे. आता नेतेदेखील अजित पवारांबाबत खूप बोलतात. पण ते फारसं सकारात्मक नसतं.

अशातच आता कार्यकर्त्यांनाही धाडस आलं आहे अजित पवारांबाबत बोलायला. मग आता हे ठरलंय की, मुद्दाम केलं जातंय. अजित दादांना वेगळं करायचं. सर्व जागांवर अजित दादांना उभं करायचं. पाडण्यासाठी उभं करायचं. शरद पवारांचा पक्ष आहे, त्यांची मतं खाण्यासाठी उभं करायचं. पण आमदार एवढे खुळे नाहीत, त्यांनाही माहीत आहे, भाजप त्यांचा कसा वापर करणार आहे. त्यामुळे एकतर अजित पवार भाजपसोबत राहिले, तर त्यांना २० ते २२ जागा दिल्या जातील. आणि जर ते भाजपसोबत नाही राहिले तर मात्र सगळ्या जागांवर त्यांचे आमदार उभे राहतील, पण निवडून मात्र कोणीच येणार नाही.” असे रोहित पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.