Pimpri Chinchwad Cyber Cell | पिंपरी: सायबर सेलकडून 4 कोटीची फसवणूक झालेले तीन गुन्हे उघडकीस, 8 आरोपींना अटक

0

पिंपरी : Pimpri Chinchwad Cyber Cell | पिंपरी चिंचवड सायबर सेलच्या पथकाने एका आठवड्यामध्ये चार कोटी रुपयांची फसवणूक झालेले तीन गुन्हे उघडकीस आणले असून आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

रावेत येथे राहणाऱ्या फिर्यादी यांना मेटल कॉईन्समध्ये गुंतवणूक केल्यास तिप्पट परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी यानी विनविन कार्पोरेशन कंपनीमध्ये वेळोवेळी दोन कोटी 10 लाख रुपये गुंतवले. मात्र परतावा मिळाला नसल्याने फिर्यादी रावेत पोलीस ठाण्यात सोनी साह या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करत असताना फिर्यादी यांनी पाठवलेल्या 20 लाख रुपयांपैकी पाच लाख रुपये एचडीएफसी बँक खात्या पाठवण्यात आले होते. त्या खातेधारकाची माहिती घेतली असता ते बँक अकाऊंट अनिकेत अर्जुन पवार (रा. जे.एस.पी.एम. कॉलेज, नऱ्हे) याच्या नावावर असल्याने त्याच्याकडे तपास केला. त्यावेळी त्याने खात्यात जमा झालेली रक्कम त्याचा मित्र रोहित विकास पवार (रा. जळगाव रोड, कोरेगाव, सातारा, सध्या रा. शास्त्री नगर, कोथरुड) याने पाठवल्याचे सांगितले. ही रक्कम आरोपी रोहीत पवार याने मुजफर मक्सुद बागवान (रा. आंबेगाव पठार, कात्रज) याला देऊन त्या बदल्यात यु.एस.डी.टी क्रिप्टो करन्सी घेतली. गुन्ह्यात रोहित पवार व मजफर बागवान यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने दोघांना अटक करुन रावेत पोलिसांच्या ताब्यात दिले.

99 लाख रुपयांची फसवणूक झाल्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना फसवणुक रक्कम रिषभ एंटरप्रायझेस नवाच्या बँक खात्यावरुन ग्लोबल हॉरिझॉन इंटरनॅशनल कंपनीच्या अकांउटवर गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ही रक्कम फॉरेन्स करन्सी देणाऱ्या गोम्स फॉरेक्स इंडिया प्रा. लि. व चिरायु फॉरेक्स कंपनी प्रा. लि. या कंपनीच्या खात्यावर पाठवल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात स्टिफन गोम्स (वय-52 रा. खारेगाव कळवा, ठाणे) व कमलेश थानाराम माळी (वय-32 रा. टेंभी नाका, ठाणे वेस्ट) यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वाकड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ऑनलाईन टास्क द्वारे 89 लाख 61 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. तपासादरम्यान ही रक्कम कन्हैया वकिल कनोजिया (वय-36 रा. फुटी रोड, ठाणे इस्ट) याच्या बँक खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. कन्हैया याने ही रक्कम आरोपी आदिल अन्वर खान (वय-21 रा. नयानगर, मिरारोड पुर्व, मुंबई) व रियान अर्शद शेख (वय-22 रा. मिरारोड पुर्व) यांना काढून दिल्याचे सांगितले. सायबर सेलच्या पथकाने दोघांना ताब्यात घेऊन पिंपरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. दाखल गुन्ह्यात कन्हैय्या याच्या सात बँक खात्यावर देशभरातून 50 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर आदिल खान याच्या बँक खात्यावर तीन तक्रारी प्राप्त असून त्यापैकी एक पुणे शहरातील आहे. आरोपींनी अंदाजे चार ते पाच कोटींचा अपहार केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, नितीन गायकवाड, रविंद्र पन्हाळे, पोलीस अंमलदार दिपक भोसले, बिच्चेवार, अतुल लोखंडे, श्रीकांत कबुले, सौरभ घाटे, अशोक जवरे, कृष्णा गवळी, रमेश कारके, सचिन घाडगे, अभिजित उकिरडे, स्वप्निल खणसे, सुरज शिंदे, आनंद मुठे अनिकेत टेमगिरे, बळीराम नवले, बनसोडे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.