Maharashtra Monsoon Session | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणावरुन विधिमंडळात खडाजंगी, पुणे पोलीस आयुक्तांचा राजीनामा घेणार का? विरोधकांचा सवाल

0

‘पुणे पोलीस आयुक्तांनी ‘प्रो अॅक्टीव्ह’ भूमिका घेतली’ गृहमंत्र्यांकडून आयुक्तांची पाठराखण (Video)

मुंबई : Maharashtra Monsoon Session | पुण्यातील कल्याणीनगर भागात मागिल महिन्यात झालेले पोर्शे कार अपघात प्रकरण (Kalyaninagar Car Accident Pune) आणि पुणे ड्रग्जप्रकरणावरुन (Pune Drugs Party) आज सभागृहात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांच्या प्रश्नला उत्तर देताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांची पाठराखण केली. पोर्शे कार अपघातात पुणे पोलीस आयुक्तांनी ‘प्रो अॅक्टीव्ह’ भूमिका घेतली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पुणे पोलीस (Pune Police) आयुक्तांचा राजीनामा घेणार का? असा सवाल विचारला होता. यावर देवेंद्र फडणवीस सभागृहात बोलत होते.

विजय वडेट्टीवार यांचे गंभीर आरोप

पोर्शे कार अपघात प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गृह विभागावर गंभीर आरोप केले. कायद्याचं राज्य राहिलं नाही, पोर्शे कार अपघातातील कारला सहा महिन्यांपासून नंबर प्लेट नव्हती, तरीही कार रोडवर धावत होती. त्यामध्ये काही राजकीय कारण आहे का, याचा तपास केला पाहिजे. तसेच ब्लड सँपल बदलण्यात आले होते. पुण्यात 450 ओपर टेरेस हॉटेल्स आहेत. पोलिसांसाठी पाच लाखांचा हप्ता घेतला जातो असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. तर लहान हॉटेल्ससाठी अडीच लाख रुपयांचा हप्ता आहे. पुण्यात गुंडांची परेड घेतली की ओळख करुन दिली, असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

संभाजीनगरमध्ये आरोपी पकडत असताना काय तोडपाणी झालं आहे, कोण होत याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली. तसेच पुण्याचा उडता पंजाब झाला आहे. सांस्कृतिक व सामाजिक म्हणून पुणे शहराचे नाव आहे. इथे बाहेरचे मुले येतात, त्यांच्या पालकांना आता या ठिकाणी पाठवायचे की नाही याची चिंता वाटते, असे म्हणत पुण्यातील बिघडलेल्या संस्कृतीवरुन वडेट्टीवार यांनी सभागृहात सरकारला जाब विचारला.

पुण्यात जवळपास 27 अनधिकृत पब सुरू होते. कोणाकडून किती हाफ्ता घ्यायचा याचे रेटकार्ड तयार आहेत ही बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यांना कोणताही परवाना दिला नव्हता, तरी ते चालू होते. असा आरोप त्यांनी केला. त्यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त झोपले होते काय असा सवाल ही त्यांनी केला.तुम्ही पुणे पोलीस आयुक्तांचा राजीनामा घेणार का? असा सवाल उपस्थित करत सध्याच्या व्यवस्थेमुळे पुण्याचा 500 कोटींचा सरकारचा महसूल बुडत असल्याचा दावाही त्यांनी विधानसभेत केला.

फडणवीसांचे वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर

वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे ही सांस्कृतीक राजधानी आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. जगभरातून उद्योग पुण्यातच येतात. त्यामुळे पुण्याचा उल्लेख उडता पंजाब करुन पुण्याची बदनामी करु नये. देशभरात त्याची बदनामी होते. असे बोलणे एका जबाबदार नेत्याला शोभत नाही. पोर्शे कार अपघात प्रकरणात कोणाला क्लिन चिट देण्यासाठी मी याठिकाणी बसलेलो नाही. या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रो अॅक्टीव्ह भूमिका घेतली आहे. या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांवर कारवाई करावी अशी एकही बाब समोर आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी रेट कार्डचा आरोप फेटाळून लावला. कोणी तरी रेटकार्ड घेवून येतो आणि सांगतो हे रेटकार्ड असे बोलणेही योग्य नाही. अशी कोणतीही रेटकार्ड नाहीत. रेटकार्ड बद्दल काँग्रेसलाच माहित असेल असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. मात्र, विरोधी पक्षनेत्यांनी दिलेली माहिती सत्य समजून चौकशी केली जाईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.