Devendra Fadnavis On Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन प्रकरणावरुन विधानसभेत विरोधक आक्रमक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निवेदन; सांगितल्या पोलिसांच्या ‘या’ चुका

0

मुंबई : Devendra Fadnavis On Pune Hit & Run Case | पुण्यातील कल्याणीनगर परिसरात 19 मे रोजी पोर्शे कार अपघात प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाली (Kalyani Nagar Porsche Car Accident Pune). या प्रकरणावरुन विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाले (Maharashtra Monsoon Session). त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारकडून आरोपीला अभय दिलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यासंदर्भातला मुद्दा आज ठाकरे गटाचे सुनील प्रभू (Sunil Parbhu) यांनी उपस्थित केल्यानंतर त्यावर फडणवीस यांनी सविस्तर निवेदन दिलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी घटना घडली तेव्हापासूनचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. हा मुद्दा नक्कीच गंभीर आहे. ही घटना 19 मे 2024 रोजी रात्री अडीचच्या सुमारास घडली. त्यानंतर त्या मुलाला लोकांनी थोडी मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलीस स्थानकात आणलं (Yerawada Police Station) . त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो 304अ होता. पण त्यानंतर वरिष्ठांनी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की 304 अ नाही तर 304 चाच गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यामुळे त्याच दिवशी केस डायरीमध्ये 304 चा गुन्हा दाखल केला. असं फडणवीस यांनी सांगितले.

अर्जात स्पष्टपणे बाजू मांडली आहे

ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर (Juvenile Justice Board-JJB) दाखल अर्जात स्पष्टपणे बाजू मांडण्यात आली आहे. संबंधित मुलाचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं असून त्यानं निघृणपणे सदरचं कृत्य केलं आहे. त्याची जन्मतारीख 14 सप्टेंबर 2006 असून त्याचं वय 17 वर्ष 8 महिे इतकं झालं आहे. त्याच्या वयाचा विचार करता त्याला प्रौढ समजून ते न्यायालयाकडे वर्ग करावे अशी विनंती आहे, असं पोलिसांनी त्या अर्जात म्हटलं आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहाला दिली.

निर्भया प्रकरणाचा दाखला

निर्भया घटनेनंतर 17 वर्षांच्या वरचे जे आहेत आणि थंड डोक्याने त्यांनी एखादं कृत्य केल्याचं लक्षात आलं तर त्यांना प्रौढ मानता येतं याबाबतची तरतूद आहे. त्यानुसारच ही मागणी करण्यात आली होती. त्या बोर्डाच्या सदस्यांनी तो अर्ज दाखल करुन घेतला. त्यानंतर त्याला काय शिक्षा दिल्या हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर लगेच पोलिसांनी त्यावर अपील दाखल केली. न्यायालयाने पोलिसांना सांगितले की तुम्हाला रिव्ह्युचा अधिकार आहे. त्यासाठी आम्ही बोर्डाकडे याचिका दाखल केली, तेव्हा त्यांनी आपला जुना निर्णय बदलला आणि आरोपीला कोठडी दिली. असेही फडणवीस म्हणाले.

पोलिसांची तात्काळ कारवाई

आरोपीच्या रक्ताचा नमुना घेतला होता. जेव्हा त्या नमुन्यामध्ये अल्कोहोल नसल्याचं लक्षात आलं. तेव्हा पोलिसांना त्यात काही गडबड असल्याचे दिसले. तेव्हा पोलिसांनी तात्काळ त्याचा डीएनए (DNA), त्याच्या वडिलांचा डीएनए आणि रक्ताच्या नमुन्याचा डीएनए तपासला. तो मॅच होत नसल्याचं समोर आलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित डॉक्टरांना अटक केली. त्यात एकानं तीन लाख रुपये घेऊन नमुना बदलल्याचं कबूल केलं, असं सांगत पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. (Sassoon Hospital)

110 किलोमीटर प्रति तास वेगाने कार चालवली

पहिलं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. क्रॅश इम्पॅक्ट अॅनालिसिस करण्यात आलं. मुलानं जेव्हा ब्रेक मारला, तेव्हा लॉक झालेला वेग 110 किलोमीटर प्रतीतास एवढा आहे. त्यामुळे अत्यंत वेगानं तो कार चालवत होता. त्याच्या घरापासूनचं सीसीटीव्ही फूटेज जप्त केले आहे. जो आधी ज्या बारमध्ये बसला, जिथे दारु प्यायला त्याचं सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) जप्त करण्यात आलं आहे. दुसऱ्या बारमध्ये जिथे बसला, त्याचं देखील सीसीटीव्ही फूटेज जप्त झालं आहे. त्यामुळे पुराव्यांमध्ये कुठेही कमतरता नाहीये, असंही फडणवीस यांनी सांगितले.

वडील व आजोबावर अपहरणाचा गुन्हा

त्याच्या वडिलांवरही कारवाई करण्यात आली आहे. वडिलांनी मुलगा प्रौढ नसताना त्याला गाडी चालवायला देणं, या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बार चालकांवरही कारवाई झाली आहे. त्याच्या आजोबांनी त्यांच्या चालकाला हा गुन्हा अंगावर घेण्याची गळ घातली. पण पोलिसांनी चालकाचं ऐकलं नाही. त्या आजोबांनी चालकाला एक दिवस घरात कोंडूनही ठेवलं. पण त्यांनं काही त्यांचं ऐकलं नाही. वडिल आणि आजोबांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून ते अटकेत आहेत.

पोलीस कुठं चुकले?

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस कुठे चुकले हेही सांगितले. पहिली चूक ही आहे की जेव्हा त्याला रात्री तीन वाजता पोलीस स्थानकात आणलं तेव्हा त्याला लगेच वैद्यकीय चाचणीसाठी पाठवायला हवं होतं. पण त्यांनी सकाळी साडेआठला पाठवलं. दुसरं, आसा गुन्हा घडला की साधारणपणे अपघात प्रकरणात 304 अ लावतात. पण त्यावेळी त्यांनी वरिष्ठांना आधी कळवायला हवं होतं. पण ते त्यांनी केलं नाही. वरिष्ठांनी तो 304 करायला लावला. त्यामुळे ड्युटी व्यवस्थित केली नाही यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे, असं फडणवीस म्हणाले.

70 पब्जवर कारवाई (Action On Pubs In Pune)

पुण्याच्या परिसरातील 70 पब्जवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यांनी परवान्याच्या अटी-शर्थींचं उल्लंघन केलं आहे, अशा 70 पब्जचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. ज्यांचे परवाने आहेत, तिथे कॅमेरे लावले आहेत. ज्यातून त्यांनी किती वाजता पब बंद केला, गिऱ्हाइकांना दारु देताना त्यांचं वय तपासलं आहे की नाही या बाबी तपासल्या जात आहेत. प्रवेश देतानाही गिऱ्हाईकाच्या वयाचा दाखला तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर उद्या वय न तपासता प्रवेश दिला, तर परवाना रद्द करणे, फौजदारी गुन्हा दाखल करणे, अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.