Pune Crime Accident News | पुणे: अपघातात जखमी झालेल्या शाळकरी मुलाचा मृत्यू! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप; पुना हॉस्पिटल विरोधात तक्रार (Video)

0

पुणे : Pune Crime Accident News | अपघातात जखमी झालेल्या 14 वर्षीय शाळकरी मुलावर पुना हॉस्पिटलमध्ये (Poona Hospital) उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व योग्य उपचार मिळाले नसल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून पुना हॉस्पिटल विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) तक्रार देण्यात आली आहे.

स्वराज सुबोध पारगे (वय-14) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. याबाबत सुबोध मुरलीधर पारगे (वय-46 रा. मु.पो. डोणजे, ता. हवेली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सुबोध पारगे यांचा मुलगा स्वराज हा 11 जून रोजी दुपारी चारच्या सुमारास रिक्षाने क्लासवरुन घरी जात होता. खडकवासला चौपाटीजवळ रिक्षाला एका स्वीफ्ट गाडीने धडक दिली. यामध्ये स्वराज याच्या पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुना हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते.

पुना हॉस्पिटलमध्ये स्वराज याचे एक्स-रे काढल्यानंतर त्याच्या मांडीचे हाड तुटल्याचे आढळून आले. डॉक्टरांना ऑपरेशन करावे लागेल असे सांगून पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार सुबोध पारगे यांनी पैसे जमा केले. 14 जून रोजी सकाळी स्वराज याला भुलीचे इंजेक्शन दिले. मात्र,रिअॅक्शन आल्याने त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेरुन औषध आणण्यास सांगितले. तसेच डायलिसीस करावे लागेल असे सांगून पैशांची मागणी केली. सुबोध पारगे पैशांची जमाजमव करत असताना 14 जून रोजी रात्री साडे सहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी स्वराज याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

स्वराज याला वैद्यकीय उपचारासाठी पुना हॉस्पिटल येथे अॅडमिट केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी स्वराज याच्या उपचारात हलगर्जीपणा केला. तसेच त्याच्यावर वेळेवर योग्य उपचार केले नाहीत. त्यामुळे स्वराज याचा मृत्यू झाल्याचे सुबोध पारगे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.