Sharad Pawar NCP | भाजप मधून बाहेर पडलेल्या माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार

0

पुणे : Sharad Pawar NCP | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारणाच्या समीकरणात मोठा बदल होताना दिसत आहे. मागील काही कालावधीत राज्यात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी पक्षात (NCP) फूट पाहायला मिळाली. त्यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष (Shivsena UBT) एकत्र येत त्यांनी महायुतीचा सामना केला.

यामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडी कडून मोठा फटका बसला आहे. ४८ पैकी ३१ मतदारसंघात मविआ चे उमेदवार तर महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. महायुतीत भाजपाला ९, शिंदे गट ७ आणि अजित पवार गटाला अवघी एक जागा मिळाली.

हातात पक्षाचे चिन्ह नसताना नवीन मिळालेल्या चिन्हासह अवघे काही आमदार आणि नेते बरोबर घेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे १० पैकी ८ खासदार निवडून आले. लोकसभेच्या निकालानंतर सर्व पक्षीयांकडूनच विधानसभेची तयारी सुरु झालेली दिसत आहे. दरम्यान आता पक्षांमध्ये इन्कमिंग, आऊटगोईंग सुरु झालेली आहे. शरद पवारांनी कधीकाळी आपल्यापासून दूर गेलेल्या नेत्यांना पुन्हा सोबत घेण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यांनतर माजी केंद्रीय मंत्री आणि शरद पवार यांच्या निकटवर्तीय राहिलेल्या सूर्यकांता पाटील या पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत. आज त्या शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील.

शरद पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्या म्हणून ओळख राहिलेल्या सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांची कारकीर्द चढती राहिली आहे. नांदेड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून आपल्या कामाची चुणूक दाखविल्यानंतर १९८० मध्ये हदगाव मतदारसंघातून निवडून येत त्यांनी विधानसभेत प्रवेश केला.

त्यानंतर १९८६ मध्ये काँग्रेसकडून त्या राज्यसभेवर गेल्या तर १९९१, १९९८ आणि २००४ असे तीन वेळा त्या लोकसभेत पोहचल्या. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री या पदाची धुराही त्यांनी सांभाळली. मात्र नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीवेळी हिंगोली मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

तरीही विधान परिषदेवर वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु पक्षाने रामराव वडकुते या नव्या चेहऱ्याला मैदानात आणले. त्यानंतर सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर झाल्या. २०१४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.