Pune Nashik Highway Accident | ‘माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं मद्यप्राशनही केलेलं नव्हतं’; अपघातानंतर आमदार दिलीप मोहिते पाटलांचे स्पष्टीकरण

0

पुणे : Pune Nashik Highway Accident | कल्याणीनगर भागात पोर्शे कार अपघातात (Kalyani Nagar Car Accident Pune) दोघांना कारने चिरडल्याची घटना ताजी असतानाच आता खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्या पुतण्याने पुणे नाशिक महामार्गावर दोघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर (Mayur Mohite) हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेने येत होता. तो विरुद्ध दिशेने सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारने धडक दिली.

अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ” अपघातानंतर माझा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते (Mayur Sahebrao Mohite) हा कुठं ही पळून गेला नाही. शिवाय त्यानं मद्यपानही केलेलं नव्हतं. माझा पुतण्या अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस अजूनही चौकशी करतील, पोलिसांनी माझ्या पुतण्याचे वैद्यकीय तपासणीसाठी सॅम्पल्स घेतलेले आहेत. अपघातग्रस्त तरुणाला माझ्या पुतण्यानं रुग्णवाहिकेमध्ये टाकलं आहे. त्यामुळे इतर आरोपांत मला तथ्य वाटत नाही. पण मी अपघातस्थळी नव्हतो. त्यामुळे या सर्व घडामोडींची मी नक्कीच शहानिशा करीन.” असे आमदार मोहिते पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ” माझा पुतण्या आयुष्यात कधीही दारू प्यायलेला नाही, तो दारू पित नाही. तो इंजिनिअर आहे, तो दारू पित नाही. तो उद्योजकदेखील आहे. त्यामुळे असले प्रकार त्यानं त्याच्या आयुष्यात केलेले नाहीत. तसेच अपघात झाला त्या ठिकाणी कुणीच नव्हतं. त्यामुळे प्रथमदर्शनी चूक नेमकी कुणाची? हे अजून पोलिसांनी मला सांगितलेलं नाही. पोलीस ज्यावेळी माहिती देतील, त्यावेळी मी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल, असं मोहिते पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.