Jayant Patil | लोकसभेननंतर जयंत पाटलांना कोणाकोणाचे फोन? माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा

0

मुंबई: Jayant Patil | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) या लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले. भाजपची ९ जागांवर घसरण झाली, शिंदेच्या शिवसेनेला (Shivsena Shinde Group) ७ जागा मिळाल्या तर सर्वाधिक फटका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar NCP) बसला. कारण या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

लोकसभेतील या अपयशानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या राजकीय भविष्याबाबत असुरक्षितता निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.अशात माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या सर्व घडामोडींवर खळबळजनक दावा केला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतीच पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आम्हाला सोडून गेलेल्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणत चुळबूळ सुरू झाली आहे. त्यामुळे आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आम्हा अनेकांना त्यांचे फोन येत आहेत. त्यामुळे पक्षाची काय भूमिका आहे हे लक्षात घेऊन पुढील काळात त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येतील.” असे त्यांनी म्हंटले आहे. मात्र कोणाकोणाचे फोन आले याबाबत नाव घेऊन त्यांनी वाच्यता केली नाही. त्यामुळे जयंत पाटलांना नेमके कोणाचे फोन आले होते हे अनुत्तरित आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अजित पवारांनी काही नेत्यांना बरोबर घेऊन शरद पवारांशी फारकत घेत महायुतीत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत हातात पक्षाचे चिन्ह नसताना मात्र मोजके आमदार नेते असताना शरद पवारांचे १० पैकी ८ खासदार निवडून आले.

दरम्यान अजित पवारांबरोबर गेलेल्या नेत्यांना आपण राजकीय आत्महत्या केल्याचा विचार मनात येत आहे. त्यामुळे शरद पवार गटात जाऊनच राजकीय कारकीर्द वाढवता येणार असल्याची काही नेत्यांची भूमिका आहे. आता या नेत्यांना पक्षात घेतले जाणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.