MNS – Maharashtra Assembly Elections 2024 | पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या 21 जागांवर मनसेची तयारी; युतीबरोबर की स्वतंत्र, राज ठाकरे ठरवणार

0

पुणे : MNS – Maharashtra Assembly Elections 2024 | मागील काही काळ प्रत्यक्ष निवडणूक लढवण्यापासून मनसे थोडी दूरच आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विधानसभेच्या (Vidhan Sabha Election In Maharashtra) तयारीला लागा असा आदेश दिलेला होता. दरम्यान आता त्याबाबत तयारी सुरु झाल्याचे दिसत आहे.

नाशिक पाठोपाठ पुण्यात मनसेचे चांगले राजकीय वजन आहे. महापालिकेत मनसेचे २९ नगरसेवक होते. पुढच्या निवडणुकीत त्याची संख्या दोन झाली तरी त्यांनतर सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कोथरूड मतदारसंघात मनसेला ८० हजार मते मिळाली होती. त्याशिवाय आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट झाली आहे. त्यांची राजकीय शक्ती विभागली गेल्याचा फायदा होईल असे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळेच पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांसह जिल्ह्यातील सर्व म्हणजे २१ मतदारसंघांमध्ये मनसैनिकांना घरोघरी संपर्क, लोकहिताची कामे, मनसेच्या ध्येय धोरणांना जनतेपर्यंत पोहोचवणे असे आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठीच्या आग्रहाबरोबरच हिंदुत्वाच्या भूमिकेबाबत आग्रही राहण्यास त्यांना सांगण्यात आले आहेत.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने पुण्यातून कसबा व कोथरूड विधानसभेला उमेदवार दिला होता, पण यश मिळाले नाही. महापालिकेची निवडणूक २ वर्षे झालीच नाही. कसबा विधानसभेची पोटनिवडणूक झाली त्यावेळी मनसे तटस्थ राहिली. लोकसभेला मनसेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला, सभा घेतली, मात्र एकाही ठिकाणी उमेदवार दिला नाही.

‘किती काळ दुसऱ्यांना पाठिंबा द्यायचा व त्यांचाच प्रचार करायचा, आपली ताकद आपण पाहायची की नाही?’ असा प्रश्न आता मनसेच्या निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडूनही केला जात आहे. त्यामुळेच ‘आता विधानसभेच्या तयारीला लागा’ या पक्षाध्यक्ष ठाकरे यांच्या आदेशाचा शब्दशः अर्थ लावून शहरातील कोथरूड , कसबा , खडकवासला यांसह इतर मतदारसंघात मनसेचे इच्छुक तयारीला लागले आहेत.

“आम्ही जिल्ह्यातील सर्व जागा टार्गेट केल्या आहेत. युती ठेवायची की नाही ? ठेवलीच तर कोणत्या जागा घ्यायच्या ? याचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचाच राहणार आहे. मात्र आपली तयारी असलीच पाहिजे. या विचाराने आम्ही पुणे शहरातील ८ ही तसेच जिल्ह्यातील अन्य जागांवरही तयारी सुरु केली आहे ” अशी माहिती मनसे नेते राजेंद्र (बाबू) वागसकर यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.