Bhamchandra Dongar Khed | पुणे : अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला हटकले, टोळक्याकडून भामचंद्र डोंगरावर साधक विद्यार्थ्याला मारहाण; 4 जणांना अटक

0

पुणे : – Bhamchandra Dongar Khed | पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भामचंद्र डोंगर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी वारकरी पंथाचा अभ्यास केला जातो. वारकरीपंथाचा अभ्यास करणाऱ्या एका साधक वारकरी विद्यार्थ्याला तरुणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली (Marhan). मुलीसोबत येथे येऊन अश्लील चाळे करताना तरुणाला हटकल्याने त्याने साथीदारांच्या मदतीने साधक विद्यार्थ्याला मारहाण केली. यामध्ये विद्यार्थ्याचा पाय मोडला असून एक विद्यार्थी जखमी झाला आहे. या घटनेनंतर भामचंद्र डोंगर परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. (Pune Crime News)

कुलदीप शिवगोंडा खोत असे जखमी झालेल्या साधक वारकरी विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी महाळुंगे पोलिसांनी (Mahalunge Police Station) चार जणांना अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.16) संध्याकाळी घडला आहे. वासुली परिसरातील भामचंद्र डोंगराला संत तुकाराम महाराज यांची अभ्यासभूमी आणि साक्षात्कार भूमी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून साधक या ठिकाणी वर्षानुवर्षे राहून वारकरी पंथाचा अभ्यास करत असतात. सध्या या ठिकाणी 30 ते 40 विद्यार्थी अभ्यास करत आहेत. रविवारी एक तरुण व तरुणी डोंगरावर आले होते. त्यावेळी ते अश्लील चाळे करत होते. त्यामुळे कुलदीप खोत या साधक विद्यार्थ्याने दोघांना हटकले. याचा राग आल्याने तरुणाने कुलदीप याला शिवीगाळ करुन मारहाण केली आणि संध्याकाळी पुन्हा मित्रांना बोलवून मारहाण केली.

टोळक्याने केलेल्या मारहाणीत कुलदीप याचा पाय मोडला आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या एका विद्यार्थ्याला देखील टोळक्याने मारहाण करुन जखमी केले आहे. कुलदीप याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या घटनेचा भामचंद्र डोंगर सप्ताह समितीने निषेध केला असून या टोळक्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

भामचंद्र डोंगरावर नेहमी तळीराम आणि प्रेमी युगुल वावरत असतात. त्यांच्याकडून साधक वारकरी विद्यार्थ्यांना धमकावण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. मात्र, कालच्या घटनेनंतर परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश नवले करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.