Pune Drug Case | पुणे ड्रग्ज प्रकरणाचा तपास NCB कडे वर्ग, कुरकुंभच्या कारखान्याची ड्रग्स तस्करीची लिंक परदेशात

0

पुणे : Pune Drug Case | पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी (Kurkumbh MIDC) मधील एका कारखान्यातून 3 हजार 674 कोटी रुपयांचे तब्बल 1 हजार 836 किलो मेफेड्रॉन (Mephedrone) जप्त केले होते. या कारखान्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज रॅकेट पुणे पोलिसांनी उघड केले. या गुन्ह्याची व्यप्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर असल्याने याचा तपास आता पुणे पोलिसांकडून (Pune Police) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कडे वर्ग केला आहे. 10 जून रोजी संपूर्ण तपास कागदपत्रांसह एनसीबीकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी दिली.

मेफेड्रॉन विक्री, तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांनी सोमवार पेठेत (Somwar Peth Pune) कारवाई करुन गुंड वैभव उर्फ पिंट्या माने, साथीदार अजय करोसिया, हैदर शेख यांना पकडले होते. शेख याच्या विश्रांतवाडीतील गोदामात छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रोन, कच्चा माल जप्त केला होता. तपासात विश्रांतवाडी (Vishrantwadi), सोमवार पेठेतून जप्त करण्यात आलेले मेफेड्रोन कुरकुंभ येथील अर्थकेम कंपनीत तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पुणे पोलिसांनी अर्थकेम लॅब्रोटरीजचा मालक भीमाजी परशुराम साबळे, ड्रग्ज बनविण्यात माहिर असलेला युवराज बब्रुवान भुजबळ आणि आयुब मकानदार यांना अटक केली होती. तर पुढे सुनील बर्मन, अशोक मंडल, शोएब शेख, पप्पू कुरेशी, अली शेख, सॅम उर्फ ब्राउन आणि मास्टर माइंड संदीप धुनिया यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पुणे पोलिसांनी पुणे, कुरकुंभ, दिल्ली, सांगली परिसरात छापे टाकून कारवाई केली होती.

कुरकुंभ येथील अर्थकेम कंपनीत तयार करण्यात आलेल्या मेफेड्रॉनची तस्करी संदीप धुनिया परदेशात करत असल्याची माहिती तपासात समोर आली. धुनिया नेपाळमार्गे दुबईत पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला. परंतु त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. विश्रांतवाडीतील हैदर शेखने पप्पू कुरेशीला पुणे, महाराष्ट्र, दिल्लीत मेफेड्रोन विक्रीसाठी दिले होते. कुरेशी धुनिया, शोएब शेख यांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात मिळाली होती. कुरेशीने पुण्यात एक गोदाम भाड्याने घेतले होते. तिथून पोलिसांनी मेफेड्रोन जप्त केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.