Alibag – Pune Crime News | अती धाडस तरुणाला जीवावर बेतले, पुण्यातील तरुणाचा अलिबागच्या समुद्रात बुडून मृत्यू

0

अलिबाग : – Alibag – Pune Crime News | वर्षा विहार करण्यासाठी पुण्यातील पाच मित्र अलिबाग येथे गेले होते. अलिबाग येथील समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. पोहण्यासाठी गेल्यावर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गुरुवारी (दि.13) दुपारी घडली आहे.

अविनाश शिंदे (वय 27 रा आळंदी, पुणे मूळ रा. औरंगाबाद) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. जीवरक्षक यांनी अविनाश याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला आहे. अविनाश पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून मित्रांसोबत आलिबागला पर्यटनासाठी गेला होता. तिथे समुद्रकिनारी आल्यावर तो एकटाच पोहण्यासाठी पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. समुद्रातून तो त्याच्या मित्रांना हात करत होता. मात्र, काही वेळात तो नजरेआड झाला

त्यावेळी जीव रक्षकांनी लगेचच पाण्यात उडी घेतली. मात्र, जीवरक्षक अविनाशला वाचवू शकले नाही. जीवरक्षक आणि पोलिसांनी अविनाशला शोधण्याचा प्रयत्न केला असता कोर्टाच्या मागील बाजूला असलेल्या किनाऱ्यावर त्याचा मृतदेह सापडला. अविनाशच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर आणि मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश शिंदे हा पुण्यातील आळंदी येथे एका कंपनीत कामाला होता. त्याचे इतर चार मित्र देखील त्याच कंपनीत कामाला आहेत. पावसाळ्यात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पाच मित्र अलिबागला गेले होते. अविनाशच्या नातेवाईकांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली. पावसाळ्यात समुद्राला सतत भरती येत असते. त्यामुळे पावसाळ्यात समुद्रात पोहण्यासाठी जाण्याचे धाडस करु नका, त्यामुळे जीव गमवावा लागू शकतो, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.